प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांची सर्वसाधारण सभा घेता येणार नाही. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीचे सन २०१९-२० या अर्थिक वर्षातील लाभांश, कायम ठेव व्याज, वर्गणी ठेव व्याज सभासदांना वाटप करण्यासाठी शासनाने परवानगी द्यावी या मागणीचे निवेदन संचालक मंडळांच्यावतीने ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना दिले.
सर्वसाधारण सभांमध्ये लाभांश, कायम ठेव व्याज आदीचे वाटप केले जाते. पण कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जमावबंदी असल्यामुळे सहकारी संस्थांची सर्वसाधारण सभा होणार नाहीत. त्यामुळे मंत्रालय स्तरावर बैठक घेऊन लाभांश व ठेव वाटपास परवानगी देण्याबाबत परिपत्रक काढावे अशी आग्रही मागणी मंत्री मुश्रीफ यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी त्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही मंत्री मुश्रीफ यांनी दिली. यावेळी सोसायटीचे चेअरमन राजीव परीट, संचालक एम.आर.पाटील, के. आर. किरुळकर, रणजित पाटील, नसिर शेख, महावीर सोळांकुरे यांच्यासह युनियन अध्यक्ष उपस्थित होते.