प्रतिनिधी/ कराड
समता सामाजिक विकास संस्थेतर्फे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंतीनिमित्त कोरोनाबाधित व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्याचे आव्हानात्मक कार्य करणाऱया कराड नगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱयांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कोरोनाने मयत झालेल्या रुग्णाचा अंत्यविधी करताना स्वतःची काळजी घेऊन उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आरोग्य कर्मचारी रामा भिसे, योगेश कांबळे, मनोज गायकवाड, परशुराम अवघडे, भगवान भिसे, सतीश भिसे, भास्कर काटरे यांचा विशेष स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. नियोजन सभापती विजय वाटेगावकर, जयंत बेडेकर, कोयना बँकेचे उपाध्यक्ष विजय मुठेकर, संस्थेचे अध्यक्ष आनंदराव लादे, आरोग्य विभागाचे निरीक्षक मिलिंद शिंदे, संस्थेचे सदस्य दिनेश चांडक, वरिष्ठ मुकादम मारूती काटरे यांच्या हस्ते या आरोग्य कर्मचाऱयांचा सत्कार करण्यात आला. पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रातर्फे आरोग्य सेविका संजीवनी सातपुते यांनी होम क्वारंटाईनबाब विशेष उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
आनंदराव लादे म्हणाले, पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱयांनी केलेले हे एक काम उल्लेखनीय आहे. त्यामुळे मुख्याधिकारी यशवंत डांगे व त्यांचे सर्व कर्मचारी यांचे संस्थेच्यावतीने आभार मानतो. आरोग्य कर्मचाऱयांनी स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी.
आरोग्य कर्मचारी रामा भिसे म्हणाले, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, जयंत बेडेकर, मुख्याधिकारी यशवंत डांगे यांचे आम्हाला पाठबळ आहे. ते स्वतः आरोग्य कर्मचाऱयासारखे आमच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करतात. यापुढेही आम्ही अशीच सेवा करत राहू.