70 टक्के ग्राहकांची पहिल्यांदाच गुंतवणूक – शेअर बाजाराला पसंती
वृत्तसंस्था/ मुंबई
इक्विटीत थेटपणे गुंतवणूक करण्यात युवकांचा सहभाग वाढला असल्याचे दिसून आले आहे. विविध कंपन्यांनी नुकताच एक सर्व्हे केला होता, त्यात शेअर बाजारात गुंतवणूकीकडे युवकांचा कल वाढला असल्याची बाब स्पष्ट झालीय.
जेरोधा, अपस्टॉक्स आणि अँजेलऑन सारख्या ब्रोकरेज कंपन्या आणि एचडीएफसी सेक्युरिटीज, आयसीआयसीआय सेक्युरिटीज सारख्या कंपन्यांच्या ग्राहकसंख्येत दुप्पटीने वाढ झाली असल्याची बाब समोर आलीय.
वरील सर्व ब्रोकरेज कंपन्यांच्या सर्व्हेनुसार त्यांच्याकडे 70 टक्के ग्राहक हे पहिल्यांदाच गुंतवणूक करणारे आहेत, ज्यांचे वय 30 वर्षापेक्षा कमी आहे. म्हणजेच युवकांचा समभागांमध्ये गुंतवणूकीकडे ओढा वाढतो आहे, हे स्पष्ट आहे. 1 कोटी इतकी रक्कम जून 2021 च्या पहिल्या आठवडय़ात आणि सप्टेंबरच्या तिसऱया आठवडय़ात गुंतवणूक केली गेली आहे.
81 टक्के युवक सहभागी
सर्व्हेत 81 टक्के युवकांनी शेअर बाजारात आणि त्यानंतर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी आवड दर्शवली आहे. बचतीसह दीर्घकालीन परताव्यावर युवकांचा भर दिसतो आहे. जेणेकरून नोकरी वा व्यवसाय करतानाच दीर्घकालीन गुंतवणूकीतून मिळणाऱया लाभाचे साथीदार होण्यासाठी युवक धडपडत आहेत, असे दिसून आले आहे.