प्रतिनिधी / नागठाणे
समर्थगाव (अतीत) ता. सातारा येथे रिसायकलिंग करणाऱ्या कंपनीस रविवारी दुपारी भीषण आग लागली. सुदैवाने कामगारांना सुट्टी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशामक दलाच्या चार गाड्यांनी रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत होते. आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे.
आशियाई महामार्गावरील निसराळे फाटा येथून पाली- सासपडे-तारळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर समर्थगाव (अतीत) गावच्या हद्दीत डोंगराच्या पायथ्याला अमेझिया व्हिजन इन्व्हायरमेंटल प्रा.ली. ही कंपनी आहे. या कंपनीत भांगारातील प्लास्टिकवर रिसायकलिंग करण्याचा प्लान्ट आहे. रविवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास कंपनीस मोठी आग लागली. रविवार कामगारांना सुट्टी असल्याने कंपनीत कोणीही न्हवते. वाऱ्यामुळे आगीने तात्काळ रौद्ररूप धारण केले. बोरगाव पोलिसांसह सातारा नगरपालिका, कराड नगरपालिका, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना व जयवंत शुगरच्या अग्निशामक दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. सायंकाळी उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू होते.