जागतिक महिला दिनानिमित्त उपक्रम : स्वस्तिक फांऊडेशनचे कार्य कौतुकास्पद – रुचाली पाटकर
वार्ताहर / देवगड:
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून देवगड कॉलेज रोड येथील समर्थ प्लाझा महिला ग्रुपच्यावतीने देवगड-जामसंडे न. पं. च्या नगरसेविका रुचाली पाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत असलदे येथील स्वस्तिक फाऊंडेशनच्या दिविजा वृद्धाश्रमाला जीवनावश्यक साहित्य भेट स्वरुपात देण्यात आले.
यावेळी समर्थ प्लाझा महिला ग्रुपच्या सौ. नम्रता तावडे, सौ. संगीता सावळे, श्रीमती सई भाबल, सौ. रेणुश्री पाटील, सौ. वर्षा घोडे, सौ. सुवर्णा पाटील, सौ. दीपाली राऊत, सौ. सुप्रिया तारी, सौ. हेमा जेठे आदी उपस्थित होत्या. सलग दोन वर्षे समर्थ प्लाझा महिला ग्रुपच्यावतीने दिविजा वृद्धाश्रमाला जीवनावश्यक साहित्य देण्यात येत असून यापुढेही असे उपक्रम राबविण्यात येतील. निराधारांना आधार देणाऱया स्वस्तिक फाऊंडेशनचे कार्य खरंच कौतुकास्पद असल्याचे नगरसेविका सौ. पाटकर यांनी सांगितले. जागतिक महिला दिनानिमित्त वृद्धाश्रमातील महिलांना शुभेच्छा देत सौ. नम्रता तावडे म्हणाल्या, वृद्धाश्रमातील नागरिकांनी स्वतःला निराधार समजू नये. आपण आपले जीवन आनंदात जगावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी समर्थ प्लाझाच्या उपस्थित महिलांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठांची संवाद साधून त्यांची विचारपूस केली. जागतिक महिला दिनी वृद्धाश्रमासाठी राबविलेल्या या उपक्रमाबद्दल स्वस्तिक फाऊंडेशनतर्फे समर्थ प्लाझा महिला ग्रुपचे आभार मानण्यात आले. दरम्यान, समर्थ प्लाझा महिला ग्रुपच्यावतीने सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यात लहान मुलांचाही सहभाग लक्षवेधी होता.