प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव येथील अग्रगण्य समर्थ अर्बन को-ऑप. पेडिट सोसायटीच्यावतीने रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या मारुती गल्लीतील मुख्य कार्यालय असलेल्या गुरुकृपा कॉम्प्लेक्सस्थित दत्त मंदिरात गुरुवार दि. 24 रोजी सकाळी ब्रह्मवृंदांद्वारे लघुरुद्राने करण्यात येणार आहे. समर्थ व्याख्यानमाला दोन महिन्यांपूर्वीच होणार होती, पण कोविड महामारीमुळे हे कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले होते. यानिमित्त होणाऱया ‘समर्थ व्याख्यानमालेतील’ पहिले पुष्प माधवबाग संस्थेचे डॉ. प्रसाद देशपांडे गुंफणार आहेत. ‘कोविडनंतरची जीवनशैली’ या विषयावर गुरुवार दि. 24 रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत ते वेबिनारद्वारा मार्गदर्शन करणार आहेत. या वेबिनारमध्ये सहभागी होऊन या व यासारख्या इतर व्याख्यानांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समर्थ सोसायटीचे चेअरमन नरहरी जोशी यांनी केले आहे. या वेबिनार कार्यक्रमासाठी https://youtu.be/MixSgNUVdjQ किंवा https://tinyurl.com/samarthbgm या लिंकवर संपर्क साधावा. ज्यांना झूमवर संपर्क साधता येणे शक्य नाही त्यांनी नंतर केव्हाही युटय़ुब लाईव्हवर या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.
ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर
समर्थ सोसायटीने अलीकडेच सुरू केलेल्या खानापूर शाखेसह बेळगाव येथील सर्व शाखांतील ज्येष्ठ सभासदांसाठी लवकरच मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजिले जाणार आहे. समर्थ सोसायटीच्या या व इतर कार्यक्रमांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.
डॉ. प्रसाद देशपांडे यांचा परिचय : माधवबाग कर्नाटक राज्य प्रमुख तज्ञ, प्रिव्हेंटिव्ह कार्डियोलॉजिस्ट
मधुमेहतज्ञ, अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर संशोधनपत्रे सादर, आरोग्यावर भारतात 1000 हून अधिक व्याख्याने दिली. डॉक्टर प्रशिक्षणात तज्ञ असून 450 पेक्षा जास्त डॉक्टरांना प्रशिक्षण दिले आहे. क्लिनिकल मानसशास्त्र समुपदेशक म्हणून 100 हून अधिक टीव्ही चॅनेलवर आरोग्यपर मुलाखती, ज्यात टीव्ही 9 कन्नड, टीव्ही 9 मराठी, साम टीव्ही, झी मराठी, दिग्विजय टीव्ही, आयुष टीव्ही, सुवर्णा कन्नड इ. चा समावेश आहे. आरोग्याशी संबंधित अनेक लेख प्रसिद्ध केले आहेत. सोशल मीडियावर लोकप्रिय चेहरा म्हणून ओळखले जाते. कर्नाटकसह दक्षिण भारताला हृदयरोग मुक्त करण्यासाठी विशेष कार्य करत आहेत.