प्रतिनिधी/ काणकोण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस समर्पण दिवस म्हणून साजरा करण्याची तयारी काणकोण भाजप परिवाराने केली असून आज 17 रोजी सकाळी काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्रात उपचार घेणाऱया रुग्णांना त्याचप्रमाणे कोविड योद्धय़ांना फळे वाटण्यात येणार आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत काणकोण मतदारसंघातील पूर्णपणे ठीक होऊन घरी परतलेल्या कोरोनाबाधितांची भाजपाचे कार्यकर्ते प्रत्येकाच्या घरी जाऊन भेट घेऊन विचारपूस करणार आहेत. काणकोण मतदारसंघात यानिमित्त विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांची आखणी करण्यासाठी नुकतीच हत्तीपावल येथील नेचर हार्मनीमध्ये काणकोणचे आमदार असलेले उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला माजी मंत्री रमेश तवडकर आणि माजी आमदार विजय पै खोत यांनाही आमंत्रण देण्यात आले होते, असे सांगण्यात आले. मात्र हे दोन्ही नेते अनुपस्थित होते. बैठकीच्या व्यासपीठावर भाजपाचे दक्षिण गोवा उपाध्यक्ष महेश नाईक, काणकोण भाजप महिला मोर्चाच्या मनुजा ना. गावकर, युवा मोर्चाचे पंकज ना. गावकर, संजू पागी व मंडळ सरचिटणीस सूरज ना. गावकर उपस्थित होते.
उद्या स्वच्छता मोहीम
पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाने जी योजना आखलेली आहे त्याचा सविस्तर तपशील फर्नांडिस यांनी मांडला. 18 रोजी काणकोण मतदारसंघातील सर्व पंचायती त्याचप्रमाणे पालिका क्षेत्रात स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले आहे. मतदारसंघातील भाजपाचे सर्व कार्यकर्ते, स्थानिक पंच, सरपंच, नगरसेवकांच्या उपस्थितीत ही मोहीम राबविली जाणार आहे. 19 रोजी रक्तदान शिबिर आणि दिव्यांग व्यक्तींना गरजेच्या वस्तू देण्यात येणार आहेत. तर 20 रोजी पंचायती आणि पालिका क्षेत्रात मिळून विविध भागांमध्ये 70 रोपटी लावण्यात येणार आहेत, अशी माहिती महेश नाईक यांनी दिली.
या बैठकीला गावडोंगरीच्या सरपंच सुमन गावकर, खोतीगावचे सरपंच दया गावकर, गावडोंगरीचे उपसरपंच कुष्टा गावकर, श्रीस्थळच्या पंच विद्या गायक, नगरसेवक श्यामसुंदर देसाई, हेमंत ना. गावकर, माजी नगराध्यक्ष समीर देसाई, रत्नाकर धुरी, माजी सरपंच देवेंद्र नाईक, प्रशांत देसाई, नंदीप भगत, सतीश पैंगीणकर, पंच पंकज नाईक, संजीव तिळवे, अनिल कामत, विशाल देसाई, संजय कोमरपंत, विकास प्रभू आणि 50 पेक्षा अधिक अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन सूरज ना. गावकर यांनी केले, तर संजू पागी यांनी आभार मानले.