महानगरपालिका निवडणूक मराठी उमेदवारांनी जिंकावी यासाठी निर्धार करा
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक येत्या 3 सप्टेंबरला होत आहे. ही निवडणूक बेळगाव शहरातील समस्त मराठी नागरिकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत मराठी मतदारांनी ज्या ऐक्याचे आणि निर्धाराचे दर्शन घडविले तशाच उत्साहाची आणि ऐक्याची या महानगरपालिका निवडणुकीतही आवश्यकता आहे.
या महानगरपालिका निवडणुकीत मराठी उमेदवार जास्तीतजास्त संख्येने निवडून यावेत आणि मराठी उमेदवारांचे बहुमत महापालिकेत व्हावे याचा प्रयत्न प्रत्येक मराठी उमेदवाराने करणे आवश्यक आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. मराठी मतांची विभागणी होऊ नये आणि या विभागणीचा लाभ मराठी विरोधी शक्तींना होऊ नये यासाठी प्रत्येक मराठी उमेदवाराने विचारपूर्वक धोरण ठरविण्याची आवश्यकता आहे. मराठी उमेदवार विजयी होऊ शकणाऱया प्रभागांमध्ये (वॉर्डांमध्ये) एकच मराठी उमेदवार स्पर्धक असावा, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. यासाठी काही उमेदवारांना आपल्या उमेदवारीचा त्याग करावा लागला तरी तो करण्याची तयारी असावयास हवी. प्रत्येक प्रभागातील मराठी मतदारांनी उमेदवारांवर दडपण वाढवून एकच मराठी उमेदवार स्पर्धेत ठेवण्याची दक्षता घ्यावयास हवी. गटबाजी टाळावयास हवी.
भूलथापांना भुलू नका
राष्ट्रीय पक्ष मराठी उमेदवारांना भूलथापा देऊन त्यांची फसगत करू शकतात. अशा आमिषांना किंवा भूलथापांना मराठी उमेदवारांनी मुळीच बळी पडू नये. बेळगावच्या मराठी अस्मितेशी प्रामाणिक राहून सर्व प्रलोभने त्यांनी धुडकाविली पाहिजेत. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार यशस्वी होऊ शकले नाहीत. आता बेळगावची महानगरपालिका निवडणूकही गमाविल्यास मराठी माणसाच्या हाती काहीच शिल्लक उरणार नाही. बेळगावच्या मराठी अस्मितेला, संस्कृतीला आणि मराठी नागरिकांनाही शक्य तितक्या सर्व ठिकाणी वाकविले जाईल. त्यांना पड खाण्यास भाग पाडले जाईल. मराठी विरोधकांचे हेच डावपेच असतात व यावेळीही आहेत. ते वेळीच ओळखून मराठी मतांची विभागणी यशस्वीरित्या टाळली गेल्यास महापालिका जिंकण्याचे स्वप्न साकार होऊ शकते, याची जाणीव प्रत्येक मराठी उमेदवाराने मनात जागती ठेवण्याची आवश्यकता आहे. आता नाही तर कधीच नाही या न्यायाप्रमाणे मराठी एकता आणि एकात्मता मजबूत करून मराठी विरोधकांना धूळ चारणे हेच एकमेव ध्येय असावयास हवे.
महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव शहर : किरण गावडे