प्रतिनिधी/ बेळगाव
लघु उद्योजकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच त्यांच्या समस्या सरकारदरबारी मांडण्यासाठी उद्यमबाग येथील लहान कारखानदारांनी एकत्रित येऊन संघटना स्थापन केली आहे. लघु उद्योजकांच्या समस्यांकडे लक्ष देण्यास कोणी तयार नसल्याने उद्योजकांनीच एकत्रित येण्याचा निर्णय घेतला. त्यातून ‘बेळगाव मायक्रो इंडस्ट्रिज असोसिएशन’ या संघटनेची स्थापना झाल्याचे अध्यक्ष रमेश देसूरकर यांनी सांगितले.
सोमवारी सायंकाळी महावीर भवन येथे या संघटनेचे उद्घाटन करण्यात आले. संतोष सुतार यांनी प्रास्ताविकाद्वारे उद्यमबाग येथील कामगारांना कामगार कार्ड देण्याची मागणी केली. कामगारांना कोणत्याही सुविधा देण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे त्यांना कामगार कार्ड देण्याची मागणी त्यांनी केली.
यावेळी उद्योजक भरत देशपांडे, राजू वर्पे, मनोज गवळी, गजानन बडवाण्णाचे, चंद्रशेखर मलकाचे, हणमंत पेडणेकर, प्रमोद मण्णूरकर, महेश लोहार, सुभाष मोटार, उमेश ठोकणेकर, एकनाथ घुग्रेटकर, मंथन कोळवणकर, रवि जाधव, प्रवीण पाटील, भूषण निलजकर, सुनील भोसले यासह इतर लघु उद्योजक उपस्थित होते.