ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
समाजवादी पार्टीचे दिवंगत नेते बेनी प्रसाद वर्मा यांचा मुलगा दिनेश वर्मा यांचे मंगळवारी दिल्लीत निधन झाले. त्यांनी दिल्लीतील फोर्टिस एस्कॉर्ट हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दुपारी 12.30 वाजता अंतिम श्वास घेतला. याच वर्षी 27 मार्च रोजी त्यांच्या वडिलांचे बेनी प्रसाद वर्मा यांचे निधन झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश वर्मा हे मागील काही दिवसांपासून किडनीच्या आजाराने ग्रस्त होते. दरम्यान अलीकडेच त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता त्यामुळे त्यांना लखनऊच्या केजीएमयू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानतंर त्यांची प्रकृती सुधारली व त्यांना घरी सोडण्यात आले होते.
मात्र, किडनीची नियमित तपासणी करण्यासाठी ते दिल्लीतील एस्कॉर्ट हॉस्पिटलमध्ये पोहचले असता त्यांची पुन्हा कोरोना चाचणी केली गेली. त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यादरम्यान त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज दुपारी त्यांचे निधन झाले.