नाटय़ परिषदतर्फे अजय कांडर लिखित ‘हत्ती इलो’ दीर्घकाव्याचे अभिवाचन
प्रतिनिधी/ बेळगाव
प्राचीन काळापासून मानवी संस्कृती आणि हत्ती यांच्यामध्ये साहचर्य असल्याचे आपण पाहत आलो. पण आज निरागस, राजस रुपाचा हत्ती म्हणजे अमानुषता, सत्ता आणि दहशत यांचे प्रतिकात्मक रूप झाला आहे. समाजकारणामध्ये माणसांचे पाठीराख्यांमध्ये आणि पाठीराख्यांचे समर्थकांमध्ये रुपांतर करण्यात मदांध हत्तीची भूमिका चिंता करायला लावणारी आहे, असे मत मेधा मराठे यांनी व्यक्त केले.
नाटय़ परिषदेच्या बेळगाव शाखेतर्फे अजय कांडर लिखित ‘हत्ती इलो’ या दीर्घकाव्याचे अभिवाचन रंगभूमी ग्रुप बेळगाव यांच्यावतीने करण्यात आले. अभिवाचनापूर्वी ‘हत्ती इलो’ याबद्दल कवी काय सांगू पहात आहे, याचे विवेचन मेधा मराठे यांनी केले.
त्या म्हणाल्या, ही कविता वाचकाला चिंतन करायला लावणारी, अस्वस्थ आणि अंतर्मुख करणारी, साहित्य विश्वाचे लक्ष वेधून घेणारी आहे. ही एक प्रकारे राजकीय कादंबरीच आहे. समाज जीवनातील सत्तांधाचे रूप म्हणजे हत्ती होय. कवी वेगवेगळय़ा रुपकांतून हत्तीचे स्वरूप दाखवितो. गावागावात पूर्वी हत्ती यायचे. संस्कृतीतला हत्ती हा परमेश्वर स्वरूप, हस्तनक्षत्राचा हत्ती हा राजा स्वरूप अशी त्यांची ओळख होती. परंतु 2012 मध्ये हे दीर्घकाव्य प्रसिद्ध झाले तेंव्हा सहय़ाद्रीच्या पश्चिम घाटात हत्तीने हैदोस घातला होता. उभ्या पिकांचा नाश केला होता. मत्त हत्तीमुळे शेतकऱयाला प्राण मुकावे लागले. याचे वास्तव कवितेत येते.
समाज जीवनाच्या वस्तुस्थितीचे भेदक चित्रण या कवितेत आहे. पूर्वी माणसे एकमेकांच्या सुख-दुःखाची वाटेकरी होतं. मात्र समाज जीवनात निर्माण झालेल्या भ्रष्टतेत माणूसपण समते आणि सत्ताकारणाचे नवे रूप घेऊन हत्ती पुढे येतो. सत्ता केंद्रित प्रवृत्ती आणि सामान्यांची हतबलता तेथे व्यक्त होते. स्वातंत्र्यापूर्वी जीवनामध्ये मूल्ये होती. स्वातंत्र्यानंतर त्याचा ऱहास झाला. हे घडले हत्तीच्या कानमंत्रामुळे. सत्तेच्या नशेतील हा धुंद उन्मत्त हत्ती हिंसा, दहशत यांना पूरक ठरणारा, चंगळवादाची चटक लावणारा, संघर्षाला प्रेमीत करणारा आणि गट करून छाप पाडणारा असाच आहे. ही कविता भारतीय जीवनपटातील सत्ता प्रतिमांकित करते. त्याचवेळी वाचकाला किंबहुना समाजाला सावध राहण्याचा इशाराही देते, असे मेधा मराठे म्हणाल्या. रंगभूमीतर्फे मेधा मराठे, सुधीर व चिन्मय शेंडे, प्राजक्ता बेडेकर यांनी अभिवाचन केले. संगीत संयोजन श्रीधर कुलकर्णी यांचे तर छायाचित्रण संकेत कुलकर्णी यांचे होते. प्रारंभी नाटय़ परिषदेतर्फे मौसमी भातकांडे यांनी सर्वांचे स्वागत केले.