युवा फोरम भारत संघटनेची पोलिसांकडे तक्रार
वार्ताहर / कुडाळ:
सध्या सर्व समाज माध्यमांवर एक छायाचित्र प्रसारित होत आहे. त्यात एका व्यक्तीने मराठी भाषिक व मराठी माणसांना गलिच्छ भाषेचा वापर करून शिवीगाळ केली आहे. मराठी अस्मिता दुखविणाऱया त्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी युवा फोरम भारत संघटनेच्यावतीने निवासी डीवायएसपी श्रीमती नदाफ व ओरोस पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या संघटनेचे कुडाळ प्रदेश अध्यक्ष हार्दिक कदम व स्वयंसेवक श्रेयस आकेरकर यांनी ओरोस पोलीस ठाणे येथे हे निवेदन सादर केले.
सध्या सर्व समाज माध्यमांवर एक छायाचित्र प्रसारित होत आहे. त्यात एका व्यक्तीने मराठी भाषिक व मराठी माणसांना गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली आहे. ज्या शिवरायांच्या भूमीत आमचा जन्म झाला आहे. ज्या महात्म्यांच्या पदस्पर्शाने हा महाराष्ट्र पावन झाला आहे, अशा महाराष्ट्रातील मराठी माणसांबद्दल अशी शिवीगाळ होणे हे केवळ दुर्दैव आहे. किंबहुना ती एक विकृत मानसिकता आहे. छत्रपती संभाजी महाराज ज्या मराठी अस्मितेसाठी लढले, त्या मराठी अस्मितेवर असा प्रकार महाराष्ट्रात खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा निवेदनातून दिला आहे. त्या व्यक्तीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.
कायदेशीर कारवाईचे आश्वासन
दरम्यान, याबाबत सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात येईल व येत्या दोन ते तीन दिवसांत ज्या व्यक्तीने व्हॉट्सऍपच्या माध्यमातून जे वर्तन केले आहे. त्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन श्रीमती नदाफ व यादव यांनी दिले.