अजयकुमार बंसल यांचा राज्यातील नाविन्यपूर्ण उपक्रम : डॉ. प्रतापराव गोळेंनी केले हजारो पोलिसांना ऑनलाईन मार्गदर्शन
प्रतिनिधी / सातारा
गेल्या दीड वर्षांपासून सुरु असलेल्या कोरोना विरुध्दच्या युध्दात सातारा पोलीस दल प्रंटवर राहून अहोरात्र कार्यरत आहेत. यामध्ये काही पोलीस बाधित झाले. मात्र लढाई सुरुच आहे. मात्र, गेल्या वर्षी काळजी घेणारे पोलीस आता तशी काळजी घेत नाहीत. त्यामुळे त्यांच्या घरातील लोकांना त्याचा त्रास होवू शकतो. त्यामुळे जिल्हय़ातील हजारो पोलीस अधिकारी, कर्मचाऱयांना एकत्रित न करता त्यांना तज्ञ डॉक्टरांकडून झूम मिटिंगद्वारे मार्गदर्शन करण्याचा अनोखा उपक्रम पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी राबवला. यावेळी पुढील काळात काळजी घेवून कोरोनापासून संरक्षण कसे करावे याचे मार्गदर्शन प्रख्यात डॉ. प्रतापराव गोळे यांनी केले.
गतवर्षी कोरोनाविषयी प्रचंड भीती. कडक लॉकडाऊन. रस्त्यावर फक्त पोलीस दल. अशा वातावरणात काम करताना अनेक पोलीस बांधव घरच्यांच्या काळजीने घराकडेही जात नव्हते. गेलेच तर दरवाजाबाहेर कपडे काढून, गरम पाण्याची अंघोळ करत होते. सॅनिटायझर, मास्कचा वापर याचा प्रोटोकॉल पाळत होते. पहिल्या लाटेतून सावरताना काही पोलीस बांधवांचा मृत्यूही झाला. आता दुसरी लाट सुरु होण्यापूर्वी पोलीस दलातील अपवाद सोडता सर्वांचे लसीकरण झालेय. मात्र सध्याच्या लाटेत पोलीस कर्मचारी बाधित येण्याचे प्रमाण नगण्य असले तरी त्यांच्या घरातील लोकांना कोरोनाची बाधा होत असल्याचे समोर येत आहे.
त्यापासून पोलीस बांधवांनी स्वतःचे कसे संरक्षण करुन कर्तव्यही बजावावे याबाबत ’तरुण भारत’ चे आवृत्ती प्रमुख दीपक प्रभावळकर यांनी पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांच्याशी चर्चा करताना तज्ञ डॉक्टर्सकडून पोलीस अधिकारी, कर्मचाऱयांना मार्गदर्शन होण्याबाबतची संकल्पना मांडली. ती तातडीने उचलून घेत एसपी बंसल यांनी स्वतःच्या केबीनमधूनच झूम मिटिंगद्वारे जिल्हाभरातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱयांना डॉ. प्रतापराव गोळे यांचे मार्गशदर्शन उपलब्ध करुन दिले आणि या मार्गदर्शनामुळे पोलीस दलाला नवी प्रेरणाही लाभली.
लक्षणे दिसताच टेस्टिंग महत्वाचे
कोरोनाला घाबरु नकाच. मात्र, सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणे, डोळे लाल होणे अशा प्रकारची लक्षणे दिसतातच. उगाच मेडिकलमधून गोळय़ा घेत न बसता डॉक्टरांचा तातडीने सल्ला घ्या. त्यांनी सांगितले की लगेच अँटीजन, आरटीपीसीआर या टेस्ट न घाबरता करुन घ्या. त्यामुळे वेळ वाया जाणार नाही. तातडीने निदान झाल्यास उपचारही तातडीने झाले की कोरोना बरा होतो तो फ्ल्यूसदृश्य असल्याचे सांगून डॉ. गोळे यांनी कोरोनावर कोणत्या औषधांचे उपचार केले जातात याबाबत सविस्तर माहिती दिली.
घरच्यांची काळजी घेण्यासाठी हे कराच
सध्या कोरोनाचा संसर्ग वाढलाय. पोलीस बांधव रस्त्यावर असतात. सर्व नागारिकांशी थेट संपर्क येतो. मी लस घेतलीय त्यामुळे मला काही होणार नाही असे म्हणत काळजी घेण्याचे सोडू नका. कारण घरी गेल्यानंतर आपल्या घरात छोटी मुले, वृध्द व इतर माणसे आहेत. त्यामुळे घरी गेल्यानंतर अंघोळ तरच कराच. मात्र गेल्या गेल्या कोमट पाण्याने गुळण्या केल्या तर त्याचा चांगला फायदा होता. फक्त हातपाय धुवणार असाल तर साबन लावून स्वच्छपणे धुवा. लक्षणे आल्यास कोरोना केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन करुन घ्या. त्यामुळे तुमच्या घरातील लोक संसर्गापासून वाचू शकतील
चौरस व नेहमीचा आहार ठेवा
कोरोना संसर्गात मास्क, सॅनिटाईजरचा वापर, सुरक्षित अंतर हे करतानाच आहार कसा असावा याबाबत सांगताना डॉ. गोळे यांनी आपला नेहमीचा साधाच डाळ, भात, आमटी, भाकरी, विविध प्रकारच्या भाज्या, अंडी, चिकन, मटण आहारात ठेवा. कोणत्याही आहाराचा अतिरेक टाळा. अल्कोहोलने कोरोना होत नसल्याची अफवा ध्यानात ठेवू नका. व्यसन हे वाईटच. योग्य आहार, विश्रांती, व्यायाम ही दिनचर्या ठेवा. जो खेळ आवडतो तो खूप खेळा आणि सकारात्मक विचाराने कर्तव्य करत रहा.
झूम मिटिंगद्वारे केले मार्गदर्शन
जिल्हय़ातील सर्व पोलीस ठाण्यात एकाच वेळी अधिकारी व कर्मचारी या झूम मिटींगमध्ये सहभागी झाले होते. एसपींच्या केबिनमधून त्याचे संचालन करण्यात येत होते. अजयकुमार बंसल यांनी देखील काही प्रश्न विचारले तर अधिकाऱयांनी देखील त्यांच्या मनातील शंका, प्रश्न उपस्थित केले. त्याची सर्मपक उत्तरे देत डॉ. प्रतापराव गोळे यांनी कोरोनाविरुध्द यापुढे कसे लढावे लागेल व त्यापासून स्वतःचे कसे संरक्षण करुन जनतेचीही संरक्षण करावे याचे विवेचन केले.
होमक्वारंटईन असे मॅनेज करा
आरोग्य विभागाने होम आयसोशलेशनचा पर्याय दिला असल्याने पोलीसच नव्हे तर नागरिक देखील कोरोना केअर सेंटरमध्ये जात नाहीत. मात्र, आयसोलेट होताना ऑक्सिपल्समीटर घरात असणे आवश्यक आहे. त्यामुळे आयसोलेशन काळातील आपला रक्तदाब, ऑक्सिजन याच्या नोंदी ठेवून डॉक्टरांच्या सल्ल्याने त्या त्या वेळी योग्य निर्णय घेता येवू शकतो. या काळात संपर्क टाळणे महत्वाचे असते. त्यामुळे घरात तशी सोय असेल तर ठीक अन्यथा कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल होणे कधीही चांगले. त्यामुळे घरातील लहान मुले, वृध्द यांचा धोका निश्चितपणे कमी होवू शकतो.
पोलीस करमणूक केंद्रातील सेंटरचा वापरा करा
दरम्यान, सध्या होम क्वारंटाईनचा पर्याय दिल्याने काही पोलीस कर्मचाऱयांना लक्षणे आल्यास ते घरी रहात आहेत. मात्र, छोटय़ा घरात नियम पाळणे शक्य नसते. त्यामुळे पोलीस कर्मचाऱयांच्या घरातील बाधित येण्याचे प्रमाण वाढतेय. त्यामुळे कोणालाही लक्षणे असल्यास पोलीस कर्मचारी, अधिकाऱयांनी पोलीस करमणूक केंद्रातील अलंकार हॉलमध्ये सुरु असलेल्या कोरोना केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन व्हावे व कालावधी, उपचार पूर्ण झाल्यावर घरी जावे, अशी सूचनाच अजयकुमार बंसल यांनी केली.