बेळगाव : श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव कार्यक्रम सुरू असून सोमवारी पालखी सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी मंदिरात चौघडा, काकड आरती, श्रीला महाअभिषेक घालण्यात आला. तसेच श्रीला मिष्ठान्न व महानैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला. तसेच पुराण वाचन झाले.
सायंकाळी श्रीच्या पालखी प्रदक्षिणेला प्रारंभ झाला. या प्रदक्षिणेची समादेवी गल्ली, गोंधळी गल्ली, गवळी गल्ली, नार्वेकर गल्ली मार्गे समादेवी मंदिरात सांगता झाली. याप्रसंगी समाजबांधव उपस्थित होते. तसेच पालखी मार्गात भाविकांनी दर्शन घेऊन औक्षण केले. मंगळवार दि. 15 रोजी सकाळी नवचंडिका होम होणार आहे. त्यानंतर 12 ते 3 या वेळेत प्रसादाचे वाटप केले जाणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री समादेवी संस्थान मंडळाने केले आहे.