ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अमेरिकेने लोकशाहीवर चर्चा करण्यासाठी व्हर्च्युअल शिखर परिषद आयोजित केली आहे. या परिषदेसाठी भारत, पाकिस्तान, इराक तैवानसह 110 देशांच्या प्रतिनिधींना निमंत्रण पाठविण्यात आले आहे. 9 आणि 10 डिसेंबरला होणाऱ्या या शिखर परिषदेतून अमेरिकेने चीनला वगळले आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी 9-10 डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या समिट फॉर डेमोक्रसीसाठी भारताला निमंत्रण मिळाले आहे. ही परिषद व्हर्च्युअल पद्धतीने असेल, पंतप्रधान मोदी या कार्यक्रमात सहभागी होतील. दरम्यान, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाइटवर या परिषदेसाठी निमंत्रित केलेल्या देशांच्या यादीतून रशिया, अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका या देशांनाही वगळण्यात आले आहे.
दरम्यान, या कार्यक्रमाच्या माध्यमातून अमेरिकेने पुन्हा एकदा तैवानला निमंत्रण देऊन चीनला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. चीन आणि तैवानमधील संबंध सध्या अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीतून जात आहेत.