म. ए. समितीच्या स्तुत्य उपक्रमाची जिल्हाधिकाऱयांकडून प्रशंसा
प्रतिनिधी / बेळगाव
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून मराठा मंदिर येथे आयसोलेशन सेंटरची जय्यत तयारी सुरू आहे. शुक्रवारी समितीच्या पदाधिकाऱयांनी प्रशासकीय परवानगीसाठी जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी हा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगून आयसोलेशन सेंटरला ‘ग्रीन सिग्नल’ दिला आहे. त्यामुळे रविवारपासून हे केंद्र कोरोना रुग्णांच्या सेवेत दाखल होण्यास तयार झाले आहे.
म. ए. समितीने आजवर केवळ राजकारण न करता सामाजिक उपक्रमही राबविले आहेत. सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे समितीने 100 बेड्सचे आयसोलेशन सेंटर तयार करण्याचा निर्णय घेतला. लोकांनी लोकांच्यासाठी चालविलेले हे आयसोलेशन सेंटर उभे करण्यात येत आहे. नागरिकांनी याला सढळ हस्ते मदत करण्यास सुरुवात केली आहे. सेंटरचे काम अंतिम टप्प्यात आले असून आता प्रशासकीय परवानगीची गरज आहे.
बुधवारी समितीच्या पदाधिकाऱयांनी जिल्हाधिकाऱयांची भेट घेऊन या केंद्राची माहिती दिली. त्यांनी ऑक्सिजन पुरविण्याचे आश्वासन पदाधिकाऱयांना दिले. तसेच जिल्हा आरोग्य अधिकाऱयांकडे अर्ज देण्यात आला आहे. शनिवारी आरोग्य अधिकारी सेंटरची पाहणी करणार असून त्यानंतर रविवारपासून हे केंद्र सुरू केले जाणार आहे. यावेळी युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, मदन बामणे, सचिन केळवेकर, महादेव पाटील, सूरज कणबरकर, सुरेश पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
मदतीचा ओघ सुरूच
समितीने लोकांमधून आलेल्या देणगीच्या माध्यमातून हे आयसोलेशन सेंटर उभारले आहे. यासाठी मदतीचा ओघ सुरूच आहे. भांदुर गल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने 51 हजार, जयराज मोदगेकर 5 हजार रुपये, किरण मोदगेकर 5 हजार रुपये, डॉ. मधुरा गुरव 5 हजार रुपये, शिवाजी अतिवाडकर 11 हजार, मिल्ट्री इंजिनियरिंग सर्व्हिस ठेकेदार 25 हजार, सुरेश रेडेकर 11 हजार, विनायक गुंजटकर 11 हजार, राजू बिर्जे यांनी 10 गाद्या, दिनेश रावळ यांनी 10 गाद्या, प्रशांत भातकांडे यांनी 10 गाद्या, संजय सायनेकर यांनी 10 गाद्या, गोवा येथील आर. वाय. पाटील यांनी 5 हजार रुपयांचा मदतीचा हात देऊ केला आहे.
आपत्कालीन व्यवस्थेला परवानगी द्यावी
मराठा मंदिर येथे महाराष्ट्र एकीकरण यांच्या माध्यमातून आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात येत आहे. परंतु मराठा मंदिर ओव्हरब्रिज येथे बॅरिकेड्स लावून रस्ता बंद करण्यात आला आहे. यामुळे आयसोलेशन सेंटरमध्ये येणाऱया रुग्णांना याचा फटका बसणार आहे. त्यामुळे आपत्कालीन व्यवस्थेला परवानगी द्यावी, अशी मागणी युवा समितीच्या माध्यमातून एडीजीपी व बेळगावचे जिल्हाधिकारी यांना ट्विटरद्वारे करण्यात आली.