ऑनलाईन टीम / मुंबई :
कार्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीच्या कारवाईनंतर चर्चेत आलेले एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या नवी मुंबईतील सदगुरु रेस्टो बारचा परवाना रद्द करण्यात आला आहे. जाणीवपूर्वक चुकीची माहिती देऊन आणि फसवणूक करून हा परवाना मिळवल्याचा आरोप ठेवत ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ही कारवाई केली.
नवी मुंबईत असलेल्या सदगुरू रेस्टो बारचा परवाना हा समीर वानखेडे यांच्या नावावर आहे. 27 ऑक्टोबर 1997 रोजी त्यांनी या बारचा परवाना घेतला, तेव्हा त्यांचे वय अवघे 17 वर्षे होते. त्यामुळे राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी अल्पवयीन असताना वानखेडेंना बारचा परवाना दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे विभागाकडून वानखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बाजवण्यात आली होती. ठाणे उत्पादन शुल्क अधीक्षक आणि वानखेडेंच्या वकिलांचे म्हणणं ऐकल्यानंतर नार्वेकर यांनी वाईन, स्पिरीट आणि मद्य विक्रीसाठी परवानगी दिलेल्या हॉटेलचा परवाना रद्द करण्याचा 6 पानी आदेश दिला.
वानखेडे यांनी अल्पवयीन असताना जाणीवपूर्वक खोटी माहिती देऊन बारचा परवाना घेतल्याचा आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. तसेच बारचा परवाना रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दारूबंदी कायद्याचे कलम 54 लागू केलं आहे.