प्रतिनिधी/ मुंबई
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) अधिकारी समीर वानखेडे यांच्या नावे ट्विटरवर बनावट खाते उघडण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र ते खाते माझे नसल्याचा दावा वानखेडे यांनी केला असून, याचा अधिक तपास सुरू आहे. त्यावर एनसीबीकडून अमूक एका ठिकाणी छापा टाकल्याचा दावा केला जात आहे. तसेच राज्यातील मंत्री नवाब मलिक यांच्याशी संबंधित वादावरही चर्चा केली जात आहे. समीर वानखेडे अमली पदार्थविरोधी कारवाईने चर्चेत आले आहेत. त्यात आर्यन खान याच्या अटकेनंतर तर सर्वत्र त्यांचीच चर्चा सुरू आहे. आर्यन खानविरुद्धच्या कारवाईनंतर नवाब मलिक हे सातत्याने वानखेडे यांच्यावर टीका करीत आहेत. ही कारवाई बनावट असल्याचा आरोप करीत मलिक यांनी वानखेडे यांना तुरुंगात पाठविण्याची धमकीदेखील दिली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता ट्विटरवर वेगळीच चर्चा वानखेडे यांच्या नावे बनावट खाते तयार करून सुरू झाली आहे.