रहस्यमय आजार, डॉक्टरही चक्रावले
प्राण्यांशी निगडित काही असे आजार असतात, जे अत्यंत जीवघेणे असतात आणि त्यावर उपचार अनेकदा शक्य नसते. सध्या इंग्लंडच्या समुद्र किनाऱयानजीक एक रहस्यमय आजार फैलावला असून त्यामुळे श्वानांचा मृत्यू होतोय. आश्चर्याची बाब म्हणजे प्राण्यांच्या डॉक्टरांनाही या आजाराविषयी माहिती नाही.
इंग्लंडच्या मिडिल्सबोरोमध्ये असलेल्या समुद्रकिनाऱयांवर जाणारे श्वान गंभीर आजारी पडत असून अनेकांचा मृत्यू देखील झाला आहे. यामुळे श्वानांना समुद्रकिनाऱयावर नेऊ नका असे निर्देश लोकांना देण्यात आले आहेत.
आजारी पडत आहेत श्वान
श्वान रहस्यमय स्वरुपात आजारी पडत असून अनेक प्रकरणांमध्येही त्यांचा मृत्यू देखील झाला आहे. समुद्रकिनाऱयापासून दूर देशाच्या अन्य भागांमध्ये म्हणजेच हंबरसाइड, डीवोन, कॉर्नवॉलमध्येही श्वान आजारी पडत असल्याचे वेटरनरी ब्रॉडकास्टर स्कॉट मिलर यांनी सांगितले आहे.
काय आहे रहस्यमय आजार?
लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. याप्रकरणी संशोधन सुरू असून लवकरच यासंबंधी उलगडा होईल असे डॉक्टर स्कॉट यांनी म्हटले आहे. या प्रकरणी पहिला रुग्ण नववर्षाच्या दिनी समोर आला होता. समुद्रकिनाऱयावर येणारे श्वान उलटी करत असून त्यांना डायरिया होत असल्याचे एका नर्सला आढळून आले होते. 150 हून श्वान समुद्रकिनाऱयावर हिंडल्यावर आजारी पडले आहेत.