इटलीतील 2 हजार वर्षे जुने रोमन शहर
इटलीत समुद्राखाली खरेखुरे अटलांटिस शहर दिसून आले आहे. समुद्रात बुडालेल्या दोन हजार वर्षे जुन्या बाइआ या शहराची अदभूत छायाचित्रे आता जगासमोर आली आहेत. या छायाचित्रांमध्ये बाइआ शहराचे आलिशान स्वरुप दिसून येते. हे शहर आता पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. बाइआ शहर इटलीच्या नेपल्स शहरानजीक होते. प्राचीन रोमन काळात या शहराला आधुनिक मोंटे कार्लोसारखा दर्जा प्राप्त होता.
समुद्राखाली दिसून येणाऱया बाइआचा ‘खजिना’ पाहून हे धनाढय़ लोकांचे शहर होते असा अनुमान तज्ञ व्यक्त करत आहेत. याच ठिकाणी सिनेटर गेइस कालपुरनियूएस पिसोने कुख्यात राजा नीरोच्या हत्येचा कट रचला होता. बाइआ शहरात रोमन राजे ऑगस्टस, नीरो आणि कालीगुला यांची निवासस्थाने होती.
याचबरोबर जूलियस सीझरच्या महालाचे काही अवशेष मिळाले असून ते स्थानिक संग्रहालयात ठेवण्यात आले आहेत. ज्वालामुखीच्या विस्फोटामुळे या आलिशान शहराचा काही हिस्सा समुद्रात बुडाला होता. पर्यटक या शहराच्या अवशेषांना गाइडच्या मदतीने पाहू शकतात.
या शहरात स्पा देखील होता, तसेच तेथे अनेक मूर्ती देखील सापडल्या आहेत. याच मूर्तींना पाहून इटलीचा हुकुमशहा मुसोलिनीने अन्य खजिना बाहेर काढण्याची सूचना केली होती. 1940 च्या दशकात इटलीच्या वायुदलाचे वैमानिक रॅमोंडो यांनी या ठिकाणाची ओळख पटविली होती.