प्रतिनिधी / पणजी
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून केरळमध्ये पूर्व मोसमी पावसाने जोरदार हजेरी लावलेली असून आज शनिवारी गोव्यात सर्वत्र जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. शुक्रवारी राज्यात सर्वत्र जोरदार वारे वाहले व सायंकाळी काही भागात पावसाने हजेरी लावली.
हवामान खात्याने सायंकाळी एक विशेष वृत्त जाहीर केले आहे व त्यात त्यांनी गोव्यात शविनारी व रविवारी मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. शुक्रवारपासून वाऱयाचा वेग बराच वाढलेला आहे. आज व उद्या तो ताशी 60 ते 70 च्या वेगाने वाहणार आहे.
या दरम्यान सध्या समुद्र खवळलेला आहे. मच्छिमारांनी खोल समुद्रात जाऊ नये. तसेच जे कोणी समुद्रात गेलेले आहेत त्यांनी त्वरित माघारी यावे, असे आवाहनही हवामान खात्याने केले आहे.
गोव्यात काल शुक्रवारी दुपारपासून ढगाळ हवामान होते. सायंकाळी उशिरा अनेक भागात पावसाने हजेरी लावली. निर्माण होत असलेले चक्रीवादळ गोव्यापासून समुद्रात दूरवर असणार असून ते गुजरातच्या दिशेने वर जाईल. वादळामुळे कर्नाटक, गोवा व महाराष्ट्रच्या किनारपट्टी भागात पावसाचा जोर राहिल. तो मुसळधारपणे पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे. समुद्र खवळलेला असल्याने लाटा 1 मीटर पेक्षा जास्त उंचीने वर येतील. त्यामुळे समुद्रकाठी राहाणाऱयांनी सावधता बाळगावी.