प्रतिनिधी / मालवण:
येथे समुद्रात उभ्या केलेल्या स्कुबा डायव्हिंगसह अन्य मच्छीमारांच्या नौका बाहेर काढण्यासाठी आवश्यक परवानगी बंदर विभागाने द्यावी, अशा सूचना आमदार वैभव नाईक यांनी मंगळवारी बंदर विभागाच्या अधिकाऱयांना दिल्या. यावेळी संचारबंदीच्या काळात व्यावसायिकांना भेडसावणाऱया अन्य समस्यांचाही आढावा त्यांनी घेतला.
मालवण दौऱयावर आलेल्या आमदार नाईक यांनी येथील तहसील कार्यालयात अधिकाऱयांकडून आढावा घेतला. तहसीलदार अजय पाटणे, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, बबन शिंदे, हरी खोबरेकर, गणेश कुडाळकर, बाबी जोगी, मंदार केणी, यतीन खोत, सहाय्यक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन तायशेटय़े, उमेश नेरुरकर, रवी तळाशिलकर, दीपक देसाई, रास्त धान्य दुकानदार संघटनेचे सुनील मलये, किरण वाळके यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
संचारबंदीमुळे किल्ला प्रवासी होडी वाहतूक सेवा पूर्णत: बंद आहे. त्यामुळे होडी वाहतूक संघटनेने केलेल्या मागणीनुसार त्यांच्या होडय़ांना रंग काढण्यासाठी आवश्यक ती परवानगी देण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या. मच्छीमारांचे बल्याव, ट्रॉलर्स काढण्यासाठी आवश्यक जेसीबी उपलब्ध करून दिला जाईल, असे तहसीलदार पाटणे यांनी स्पष्ट केले. सध्या शाळा बंद असल्याने शालेय पोषण आहार पडून असून खराब होण्याची शक्यता असल्याचे तहसीलदारांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यावर शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना घरपोच देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. महावितरणने जाहीर केलेल्या सरासरी बिल, वाहतूकदारांनी दरात केलेली वाढ, रास्त धान्य यासह अन्य विषयांवर चर्चा करण्यात आली.