गोवा फॉरवर्ड अध्यक्ष विजय सरदेसाई यांची टीका
प्रतिनिधी /मडगाव
भाजप सरकारने दंतवैद्यकीय महाविद्यालयाचे सेमिस्टर शुल्क 1 लाख रुपयांपर्यंत वाढवून विद्यार्थ्यांना लुटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करताना गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी बुधवारी सांगितले की, जागरूक तरुणांमुळे सरकारला शुल्क कमी करून 48 हजार रु. करणे भाग पडले आहे.
फातोर्डाचे आमदार सरदेसाई यांनी सोशल मीडियावर हा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला दंतवैद्यकीय विद्यार्थ्यांकडून आणि अन्य युवकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे सरकारला शुल्क कमी करणे भाग पडले. ‘मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुल्क वाढवून विद्यार्थ्यांवर बोजा टाकण्याचा प्रयत्न केला. हे लज्जास्पद कृत्य आहे. या इच्छुक दंतवैद्यकीय विद्यार्थ्यांनी आपले करिअर सेवेस समर्पित करण्याचे ध्येय ठेवले आहे. परंतु या प्रणालीमध्ये येण्यापूर्वीच सरकार त्यांच्यासमोर आर्थिक अडथळे निर्माण करत आहे. हे असंवेदनशील भाजप सरकार त्यांना प्रोत्साहित करण्याऐवजी दंतवैद्यकीय क्षेत्रात करिअर घडवू पाहणाऱया तरुणांना निराश करत आहे’, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कुटुंबांच्या आर्थिक अडचणी दिसत नाहीत. अर्थव्यवस्था कोलमडली आहे आणि लोकांच्या नोकऱया गेल्या आहेत. या परिस्थितीत कुटुंबे असे शुल्क कशी भरतील, असा प्रश्न सरदेसाईंनी केला आहे. डॉक्टरांनीही सरकारच्या या कृत्याला आक्षेप घेताना शुल्क वाढवणे ही चूक असल्याचे निदर्शनास आणून दिले. हे सरकार डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक संकटात टाकण्याचा प्रयत्न करत आहे. या सरकारला हृदय तर नाहीच आणि या सेमिस्टर फी वाढवण्याच्या कृतीने हे देखील सिद्ध केले आहे की, मुख्यमंत्री सावंत त्यांची तिजोरी रिकामी झाल्याने विद्यार्थ्यांना लुबाडण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका सरदेसाई यांनी केली आहे.