डॉ. संतोष उसगांवकर : दिलासा पॅलेटिव्ह केअर आर्थिक मदतीच्या प्रतिक्षेत,फर्मागुडी येथील पॅलेटिव्ह केअर केंद्रात पॅलेटिव्ह दिन साजरा,राज्यातील एकमेव दिलासा पॅलेटिव्ह केअर सेंटरला हवीय दात्याची मदत
प्रतिनिधी /फोंडा
मृत्यूच्या दारात असलेल्यां रूग्णांना पॅलेटिव्ह केअर सेवा देणाऱया दिलासा केअर सेंटर इस्पितळाला सरकारने आर्थिक मदत पुरवावी, जेणेकरून सर्व रूग्णांवर मोफत सेवा देणे संस्थेला सोयीचे ठरेल. सदर सेवा डीडीएसवाय योजनेला जोडून लाभ घेऊ इच्छिणाऱयांना सुलभ करून द्यावी. सामाजिक कार्यासाठी मदत करू इच्छूकांनीही सढळहस्ते मदतीसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन आयएमए फोंडा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संतोष उसगांवकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केले आहे.
दिलासा येथे दुर्धर आजाराने त्रस्त, शेवटच्या टप्प्यात असलेल्या रूग्णांना आवश्यक तितकेच औषध दिले जावे या तत्वावर काम करताना मृत्यूच्या अगदी जवळ असलेल्या रूग्णांसाठी पॅलेटिव्ह केअरची सुविधा देण्यात येते. गोवा राज्यात एकमेव असलेले आयएमए फोंडा ट्रस्टच्या ‘दिलासा पॅलेटिव्ह केअर सेंटर’मध्ये नुकताच पॅलेटिव्ह केअर दिवस साजरा करण्यात आला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्याच्यासमवेत आयएमए फोंडा ट्रस्टचे सचिव डॉ. शिरिष मंडूरकर, खजिनदार डॉ. सुभाष शिकेरकर, आयएम फोंडाचे अध्यक्ष डॉ. श्वेता खांडेपारकर, आयएमए फोंडाचे सचिव एरोन सुवारिस, आयएमएचे खजिनदार डॉ. राजाराम म्हांब्रे उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. संतोष उसगांवकर म्हणाले आयएमए फेंडा चेरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ही सेवा देण्यात येत आहे. सन 2018 साला ते आजपर्यंत सुमारे 300 रूग्णांना सेवा देण्यात आलेली आहे. मृत्यूच्या जवळ असलेल्या रूग्णांसाठी पॅलेटिव्ह केअरचा मार्ग अंत्यत उपयुक्त आहे. अशा रूग्णांना घरच्याप्रमाणे वातावरण निर्माण करण्यासाठी नियमित नवीन उपक्रम राबवून वातावरण हसतमुख ठेवण्यात येत असते. दिलासामध्ये रूग्णांसाठी ओपीडी व त्रस्त रूग्णांच्या घरी भेटी देऊन मार्गदर्शन करण्यात येते. स्वयंसेवी संस्थेनी येथील रूग्णांच्या भेटी देऊन त्याचा उत्साह वाढवावा असेही नमूद केले. यावेळी दिलासा येथे भर्ती झालेल्यापैकी एका नातेवाईकाने दिलासा केंद्रात रूग्णांना देण्यात येत असलेल्य़ा उच्च सोयीस्कर सुविधा व सेवेबाबत अनुभव कथन केला.
पॅलेटिव्ह केअरच्या जागृतीनिमित्त विद्यार्थ्यासाठी निबंध स्पर्धा
पॅलेटिव्ह केअर शेवटच्या टप्प्यात कर्करोग, ब्रेन स्ट्रोक, हायपरटेन्शन यासारख्या असांसर्गिक आजारात वृद्ध रूग्ण किंवा औषधोपचारांनी काहीच फरक पडणार नाही, अशा रूग्णांसाठी पॅलेटिव्ह केअर उपयुक्त आहे. यासंबंधी राज्यभरात व समाजातील प्रत्येक घटकापर्यंत हा उपक्रम पोचविण्याहेतू आयएमए ट्रस्टतर्फे विविध विद्यालयात जागृत कार्यक्रम आखलेले आहे. तसेच शालेय, उ. माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी निबंध स्पर्धेचे आायोजन करण्यात आलेले आहे. ही स्पर्धा तीन गटात घेण्यात येणार आहे. पहिल्या गटात इयत्ता आठवी ते दहावी, दुसऱया गटात उच्च माध्यामिक अकरावी-बारावी तर तिसऱया गटात महाविद्यालयवरील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली असून निबंधाची प्रत 24 ऑक्टो पर्यंत संकेतस्थळावर पोचती करावी असे आवाहन केले आहे. पहिल्या दोन गटासाठी ‘गोव्यात पॅलेटिव्ह केअर सेंटरचे महत्व’ या विषयावर निबंध सादर करावा. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘गोव्यातील पॅलेटिव्ह केअर सेंटरमध्ये आरोग्य कर्मचाऱयासमोरील आव्हाने’ या विषयावर सुमारे 700 ते 1000 शब्दामध्ये आपल्या स्वअक्षरात निबंध संकेस्थळावर imapondaonline@gmail.com पाठवून द्यावा.
स्पर्धेतील विजेत्यांना विद्यालयीन गटासाठी प्रथम रू. 2000, द्वितीय रू. 1000 व रू. 500 ची दोन उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येतील. महाविद्यालयीन गटासाठी प्रथम रू. 5000, द्वितीय रू. 3000, तृतीय रू. 2000 व दोन उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येतील. जागतिक पॅलेटिव्ह केअर दिनाचे औचित्य साधून आयएमए फोंडा ट्रस्टचे माजी अध्यक्ष डॉ. सर्वेश दुभाषी यांनी दिलासा संकेतस्थळाचे विमोचन केले. यावेळी त्यांनी दिलासामार्फत घेण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. या संस्थेच्या उत्कर्षासाठी देणगी स्वरूपात आर्थिक मदत करावी असे आवाहन केले.
कोविड काळात फोंडा उपजिल्हा इस्पितळाचा भारही सोसला…तरीही पदरी उपेक्षाच
कोरोना महामारीच्या आपत्कालीन परिस्थितीत जेव्हा फोंडा येथील उप जिल्हा इस्पितळ कोविड सेंटर म्हणून नेंदणी केले, त्यावेळी आयएमए फोंडा ट्रस्टच्यावतीने महत्वाची मदत पुरविताना दिलासा पॅलेटिव्ह रूग्णांना बांदोडा येथील संजीवन संस्थेत रवानगी करून आपले सुसज्ज इस्पितळाचे रूपांतर फोंडय़ातील उपजिल्हा इस्पितळात केले होते. कॅज्युलिटीसह, ओपीडी रूग्णांना कोविड काळात सेवा दिलेली आहे. मात्र आज या पॅलेटिव्ह केअर सेंटरचा भार ट्रस्टला सोसेनासा झालेला आहे. सरकार दरबारी अनेकवेळा आर्थिक मदतीचा हात पसरविल्यानंतरही कोणतीच ठोस पाऊले उचलली जात नसल्याची खंत कार्यकारिणीवरील डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
आर्थिक चणचण मात्र लागूनच दुसऱया इमारतीचे काम जोमात
फर्मागुडी येथील दिलासा केअरच्या लागूनच अवाढव्य वास्तुची उभारणी करण्यात येत आहे. परदेशात स्थायिक झालेल्या ज्या गोमंतकीयांचे ज्येष्ठ आजारी आई वडील व नातेवाईक गोव्यात वास्तव्य करीत आहे. अशा व्यक्तीना औषधोपचाराची गरज व पॅलेटिव्ह केअर सुविधेसह रहिवासी योजना असल्याची माहिती सुत्राकडून मिळाली आहे. येथे सुमारे 25 फ्लॅटची सोय असणार आहे. आर्थिक चणचण असतानाही प्रकल्प उभारण्यामागील कारण स्पष्ट झालेले नाही.