प्रतिनिधी / मडगाव
पालिका आरक्षणासंदर्भात सरकारने जो गोंधळ घातला, त्यावर काल सोमवारी उच्च न्यायालयाने योग्य निवाडा दिलेला आहे. आत्ता या निवाडय़ाला आव्हान देण्यासाठी सरकार सर्वोच्च न्यायालयात दाद मागत आहे असे करून सरकार स्वताचीच फजिती करून घेऊ नये असे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे.
काल घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्री. चोडणकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राज्यातील भाजप सरकार हे लोकांनी निवडून दिलेले सरकार नसून त्यामुळे हे सरकार लोकांच्या विरोधात काम करत आहे. आज राज्यातील प्रत्येक नागरिकाला न्यायालयात पाठवण्याचे काम सदर सरकारने केलेले आहे. पालिका आरक्षण संदर्भात सुद्धा लोकांना न्यायालयात जाऊन न्याय मिळवून घ्यावा लागला आहे.
मुख्यमंत्री व नगरविकासमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
उच्च न्यायालयात जाऊन लोकांनी न्याय मिळविला तरी सरकारला त्याची कदर नाही. आत्ता सरकार सर्वोच्च न्यायालयात जाऊन न्याय मिळवण्याचा प्रयत्न करुन स्वताची फजिती करुन घेऊ पाहत आहे. स्वताच्या सरकारची फजिती करुन घेण्यापेक्षा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व नगरविकासमंत्री मिलींद नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची मागणी गिरीश चोडणकर यांनी केलेली आहे
मडगाव येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पत्रकार परिषदेत दक्षिण गोवा काँग्रेसचे अध्यक्ष ज्यो डायस, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो व इतर उपस्थित होते.
नगरपालिका प्रशासनाच्या संचालकाना सरकारने त्वरित सेवेतून निलंबीत करावे व त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम केले पाहिजे. नवीन राज्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक करावी. नावेली मतदारसंघात होऊ घातलेल्या जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीच्या निवडणुकीत गोवा महिला प्रदेशच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो ह्या काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवणार आहे. कुतिन्हो यांनी राज्यातील जनतेच्या हितासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन तसेच नावेली मतदारसंघातील लोकांच्या निर्णयानुसार त्यांचे नाव घोषित करण्यात आलेले आहे. त्या आज मंगळवार दि. 2 रोजी सकाळी 10.30 वा. आपला उमेदवारीचा अर्ज दक्षिण गोवा जिल्हाधीकाऱयाच्या कार्यालयात सादर करतील. यावेळी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित असतील. असे अध्यक्ष चोडणकर यांनी सांगितले.
दिवंगत बाबुश कुयेल्हो यांच्या मुलाला व त्यांच्या पत्नीला भेटून हा निर्णय घेतलेला आहे. नावेली मतदारसंघातील प्रत्येक घरी भेट देऊन प्रतिमा कुतिन्हो यांचा प्रचार केला जाईल. तसेच प्रतिमा कुतिन्हो यांचाच विजय होईल. विरोधक कितीही प्रयत्न केले तरी चालतील त्यांना कोणतेही यश येणार नाही. असे चोडणकर म्हणाले.
गोवा प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या की, नावेली मतदारसंघातील सरपंच, पंच सदस्य व गावातील लोकांचे म्हणणे ऐकून आपण यंदाची जिल्हापंचायत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. निवडून आल्यानंतर लोकांच्या हितासाठी अनेक कामे गेली जाईल. गेली 24 वर्षे काँग्रेस पक्षासाठी आपण कार्य केलेले आहे. पक्षासाठी केलेले कार्य व लोकांच्या हितासाठी काम करण्याची इच्छाशक्तीच्या बळावर लोक मला निवडून आणतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.