ग्रामीण कुली संघटनेच्या महिला कामगारांची मागणी
वार्ताहर/ कडोली
सरकारला आर्थिक समस्या जाणवत असेल तर आम्ही मदत करू, पण दारुबंदी करा, अशी मागणी करीत येथील ग्रामीण कुली संघटनेच्या महिला कामगारांनी राज्य शासनाला आर्थिक मदत पाठविली.
कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. संपूर्ण देशभर झालेल्या लॉकडाऊनमुळे दारुदुकाने बंद झाली होती. त्यामुळे महिला वर्गातून समाधान पसरले होते. आर्थिक समस्या जाणवत असतानाही मिळेल ते खाऊन संपूर्ण कुटुंब एकत्र समाधानाने राहत होते. परंतू या दारुबंदीमुळे मात्र सरकारचे मोठे नुकसान होत आहे. हे जाणून घेऊन सरकारने दारुबंदी उठवून सर्व दारु दुकाने उघडली. पण सरकारच्या या निर्णयाने सर्व सामान्य कुटुंबांची मात्र आर्थिक समस्या कठीण झाली आहे. काही ठिकाणी घरचालकच दारुसाठी भरमसाठ खर्च करतो आणि घरची अवस्था बिकट होते. अशा समस्या घडत असल्याने येथील ग्रामा कुली संघटनेने शासनाने दारुबंदी करावी. प्रसंगी शासनाला आम्ही मदत करु, असे म्हणत महिला कामगारांनी पोस्टामार्फत आर्थिक मदत पाठविली. यावेळी अनिता बेळगावकर, प्रेमा नरोटी, आश्विनी पाटील, वंदना कुट्रे, रुपाली कुट्रे आदी अनेक महिला उपस्थित होत्या.