पणजीत जिल्हाधिकाऱयांचा उडविल्या हुर्यो : लोकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यास अपयश
प्रतिनिधी / पणजी
पणजीतील कला अकादमीत काल रविवारी आयोजित करण्यात आलेल्या किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखडय़ावरील (मसुदा) सुनावणीच्या वेळी सकाळच्या सत्रात गोंधळ माजला. सुनावणीसाठी नोंदणी केलेल्या काही जणांना प्रवेश देऊन इतर मोठय़ा संख्येने उपस्थित असलेल्या लोकांना प्रवेश नाकारला. बाहेर ताटकळत ठेवले म्हणून लोक चिडले व त्यांनी सरकारच्या सीझेडएमपीच्या विरोधात घोषणाबाजी केली. आत गेलेल्या लोकांनी बाहेरच्यांना आत घेण्याची मागणी केली.
आतील व बाहेरील लोकांनी हा मसुदा व सुनावणी रद्द करुन ती पुढे ढकलण्याची जोरदार मागणी केली. एकंदरित दुपारपर्यंत जनतेने विविध प्रश्न करुन सुनावणी रोखून धरली. सुनावणी घेणारेच नियम, अटी पाळत नाहीत असा आरोप लोकांनी केला. त्यामुळे सकाळी 10.30 वा. सुरु होणारी सुनावणी दुपारपर्यंत चालू होऊ शकली नाही. लोकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना समर्पक व समाधान करणारी उत्तरे सरकार किंवा सीझेडएमपी प्राधिकरणातर्फे कोणीच दिली नाहीत. नियमांचे उल्लंघन करुन ही सुनावणी घेत असल्याचा आरोप वारंवार करण्यात आला.
मोठा पोलीस फौजफाटा तैनात
तेथे उपस्थित असलेले उत्तर गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांची जनतेने हुर्यो उडवली. सुरुवातीला ताळगावच्या कम्युनिटी सेंटरमध्ये सुनावणी घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. ते अचानक बदलण्यात आले म्हणून लोकांनी जाब विचारला परंतु त्याचे उत्तर कोणीच दिले नाही. हा गोंधळ वाढत गेल्याने शेवटी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला.
ग्राम पातळीवर सुनावणी घेण्याची मागणी
कला अकादमीच्या आत गेलेल्या लोकांनी अखेर सुनावणीवर बहिष्कार घातला आणि ते सुनावणी सोडून बाहेर आले. हा मसुदा रद्द करा आणि पंचायत – ग्राम पातळीवर मसुदा करुन सुनावणी घ्या, अशी मागणी लोकांनी केली. परंतु जिल्हाधिकाऱयांनी त्यास कोणताही प्रतिसाद दिला नाही.
‘आप’तर्फे सुनावणीचा निषेध
कला अकादमीत सुनावणीसाठी आलेल्यांना अडवल्यानंतर तेथे आपचे कार्यकर्ते राहुल म्हांबरे व इतरांनी जोरदार निदर्शने केली. हे सुनावणीचे ‘नाटक’ असून ते बंद करा, अशी मागणी केली. ग्रामपातळीवर आराखडा सादर करा, असे त्यांनी सुनावले. जनसुनावणी म्हणता आणि लोकांना बाहेर कसे ठेवता? ही कसली जनसुनावणी असे प्रश्न म्हांबरे यांनी करुन त्यांनी ‘आप’तर्फे या सुनावणीचा निषेध नोंदवला. गोंधळ – गडबड इतकी होती की सुनावणी झाली की नाही हे शेवटपर्यंत कळलेच नाही.