ऑनलाईन टीम / लाहोर :
पाकिस्तानातील इम्रान खान सरकारविरोधात रॅली काढल्याप्रकरणी माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कन्या मरियम नवाज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाकिस्तानातील आर्थिक मंदी, भ्रष्टाचार, कोरोना परिस्थिती आणि वाढत्या अत्याचाराच्या घटनांवरून विरोधकांनी इम्रान सरकारला लक्ष्य करत 16 ऑक्टोबरला लाहोरमध्ये मोर्चा काढला होता. या मोर्चात लाखो लोक सहभागी झाले होते. पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेंट या 11 पक्षांच्या आघाडीने काढलेेल्या या मोर्चाचे नेतृत्व मरियम यांनी केले होते. इम्रान खान अकार्यक्षम आणि अनभिज्ञ आहेत. त्यांना देशासमोरील समस्या दिसत नाहीत. आपली अयोग्यता लपवण्यासाठी इम्रान खान लष्कराच्या आड लपत असल्याचा आरोप त्यांनी उघडपणे केला होता.
रॅलीत सरकारविरोधात घोषणाबाजी, वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, मायक्रोफोन आणि स्पीकरचा वापर तसेच कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे उल्लंघन केल्याचा आरोप मरियम यांच्यावर आहे.