ब्रिटिश कंपनीला 1 अब्ज डॉलर्सचा प्रस्ताव मंजूर – कर परतावा मिळताच मागे घेणार सर्व खटले
वृत्तसंस्था / लंडन
अमेरिकेपासून फ्रान्ससारख्या अनेक देशांमध्ये भारत सरकारच्या मालमत्ता जप्त करण्यासाठी विदेशी न्यायालयांमध्ये दाखल केलेले सर्व खटले मागे घेण्याची तयारी ब्रिटनमधील दिग्गज ऊर्जा कंपनी केयर्न एनर्जीने दर्शविली आहे. सरकारने पूर्वलक्ष्यी कर कायदा रद्द करून 1 अब्ज डॉलर्सचा परतावा देणार आहे, ही रक्कम हाती पडताच एक-दोन दिवसांच्या आत सर्व खटले मागे घेणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
पूर्वलक्ष्यी कराची पूर्ण रक्कम परत मिळविण्यासाठी भारत सरकारच्या विरोधात दाखल केलेले सर्व खटले मागे घेण्याचा प्रस्ताव कंपनीला मान्य आहे. भारत सरकार हे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्याचा प्रयत्न करत आहे. पुढील काही आठवडय़ांमध्ये तडजोड होऊ शकते असे केयर्न एनर्जीचे सीईओ सायमन थॉमस यांनी म्हटले आहे.
कंपनी पॅरिसमधील भारताची डिप्लोमॅटिक अपार्टमेंट आणि अमेरिकेतील एअर इंडियाचे विमान जप्त करण्याचा खटला परतावा मिळाल्याच्या एक-दोन दिवसांमध्ये मागे घेणार आहे. सरकारचा प्रस्ताव मान्य करून वाद निकाली काढावा अशी कंपनीच्या समभागधारकांची इच्छा आहे. कंपनीला भारत सरकारकडून परतावा मिळविण्यासाठी आर्बिट्रेशन अवॉर्ड, व्याज आणि भरपाईचा दावा मागे घ्यावा लागेल तसेच सर्व खटले मागे घ्यावी लागतील असे थॉमसन म्हणाले.