वीजमंत्री नीलेश काब्राल यांची घोषणा : राज्याची विजेबाबत स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
प्रतिनिधी /पणजी
गोव्यात 24 तास ऑनलाईन वीज सेवा उपलब्ध करण्यात आली असून वीज पुरवविण्यात सुधारणा केली आहे. सर्व सरकारी इमारतींवर सोलर वीज निर्मिती प्रकल्प उभारून गोव्याला विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यात येईल, अशी घोषणा वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी गेल्या 10 वर्षांतील वीज खात्याचा आढावा घेताना केली.
भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेच्यावेळी भाजपचे प्रवक्ते व माजी आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर उपस्थित होते.
संपर्क माहिती देण्यास टाळाटाळ
वीजेसंदर्भात लोकांच्या समस्या ऐकण्यासाठी कॉल सेंटर 24 तास खुले आहे, असे मंत्री नीलेश काब्राल यांनी सांगितले. या कॉल सेंटरसाठी कसा संपर्क करायचा याची माहिती देण्यास मात्र त्यांनी टाळाटाळ केली.
वीज गळतीचे प्रमाण उतरले
वीज बिले भरण्याची सुविधा ऑनलाईन असून आधीही वीज बील भरता येते. त्यामुळे थकबाकी राहण्याचे प्रमाण कमी झाले आहे, असे ते म्हणाले. पूर्वी वीज वितरणात साडेबारा टक्के वीज गळती होऊन नुकसान होत होते. ते आता 10 टक्के झाले आहे. जुनी यंत्रणा बदलण्यात येत असल्याने ते प्रमाण काही दिवसांत 7 टक्के होईल, असे म्हणाले.
रोज 22 मेगावॅट सोलर वीज
रुफ सोलर निर्मिती गोव्यात सुरू झाली असून 22 मेगावॅट वीज निर्मिती रोज होते. येत्या काही दिवसांत अजून 10 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प होणार, अशी माहिती त्यांनी दिली. वीज निर्मितीच्या विविध उपक्रमांमुळे राज्यात 42 टक्के वीज निर्मितीत वाढ झाली आहे. केंद्र सरकारच्या मदतीने किनारी भागातही वीज निर्मिती प्रकल्प येत असल्याचे ते म्हणाले.
वीज कमी दरात देणारे एकमेव राज्य
जास्त दराने वीज खरेदी करून कमी दरात ती लोकांना देणारे गोवा हे एकमेव राज्य आहे. हायब्रिड तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विद्युत सोलर व बॅटरी सोलर हे प्रकल्प गोव्यात सुरू होणार असल्याचे ते म्हणाले.
भाजपकाळात वीजक्षेत्रात भरीव प्रगती
राज्यभर भूमीगत वीज वाहिन्या टाकल्या जात आहेत. त्यामुळे वीज पुरवठय़ात अजून सुधारणा होईल. लोकांना स्मार्ट मीटरही बघायला मिळतील, अशी माहिती मंत्री नीलेश काब्राल यांनी दिली. भाजप सरकारने गेल्या दहा वर्षांमध्ये वीज वितरण आणि वीज निर्मितीत भरीव काम केले असून ‘वन नेशन वन ग्रीड’ या योजनेचा लाभ गोव्याला झाल्याचे ते म्हणाले.