प्रशासनाकडून परिपत्रक जारी
प्रतिनिधी / पणजी
कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेऊन राज्य सरकारने सरकारी कार्यालयात लागू केलेली बायोमेट्रिक हजेरीची पद्धत 15 मे पर्यंत स्थगित केली आहे. तसे परिपत्रक सरकारने जारी केले असून ते सर्व कार्यालयांना पाठविले आहे. तसेच त्याची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
काही महत्त्वाच्या तसेच प्रमुख सरकारी कार्यालयात बायोमेट्रिक यंत्रावर बोट लावून हजेरी नोंदविण्याची पद्धत आहे. त्या यंत्रणेत सर्व कर्मचारी, अधिकाऱयांना एकाच यंत्रात बोट लावून हजेरी नोंदवावी लागते. त्यातून कोरोना संसर्गाचा प्रसार वाढू शकतो, म्हणून ती पद्धत सध्या बंद करण्यात आली असून पूर्वीची मस्टरवर सही करून हजेरी लावण्याची पद्धत पुन्हा अंमलात आणली जात आहे.
गेल्या वर्षी 2020 मध्ये याच कालावधीत कोरोनाचा संसर्ग वाढल्याने बायोमेट्रिक पद्धत स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर कारोनाचे संकट कमी झाले आणि सरकारने पुन्हा बायोमेट्रिक पद्धत सुरू केली. परंतु गेल्या एक दोन महिन्यांत पुन्हा एकदा कोरोनाचे संकट वाढत गेल्यामुळे ती पद्धत बंद करण्यात आली आहे.