ऑनलाईन टीम / मुंबई :
महसूलात घट झाल्याने महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार देणेही सध्या शासनाला अवघड झाले आहे. त्यामुळे पुढील महिन्यात त्यांचा पगार देणेही कठीण होईल, पण जे कोरोनासाठी काम करत आहेत, त्यांचा पगार व्यवस्थित केला जाईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
वडेट्टीवार म्हणाले, कोरोनामुळे शासनाच्या महसूलात घट झाली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पुढील महिन्यात कर्ज काढावे लागण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मदत व पुनवर्सन, आरोग्य आणि इतर दोन विभाग वगळता इतर विभागात वेतन कपात करण्याची वेळ आली आहे. मात्र, डॉक्टर, नर्स आणि त्यांच्याशी निगडीत असलेल्या करोना योद्ध्यांचे पगार दिले जाणार आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सारथी संस्थेबद्दल बोलताना ते म्हणाले, काही जण संस्थेबद्दल गैरसमज पसरवत आहेत. मात्र, सारथी संस्था सुरू राहील. यावर्षी देखील सारथी संस्थेसाठी पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय. सारथी बाबत हे राजकारण कोण करतय याबद्दल मी आत्ता बोलणार नाही, असं ते म्हणाले.
वडेट्टीवार म्हणाले की, सारथीच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. फक्त प्रशिक्षण देण्यापुरती सारथी मर्यादित राहणार नाही. सारथीला साधारणपणे 38 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. येणाऱ्या कॅबिनेट मिटींगमध्ये याचा निर्णय घेतला जाईल असंही ते यावेळी म्हणाले.