सोलापूर : प्रतिनिधी
सहायक पोलीस निरीक्षकांना धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरुन मोहम्मद तस्लीम रहेसुल जामाखान यास एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व दंड जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. शिंदे यांनी ठोठावला.
फिर्यादी शहर वाहतुक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील हे पोलीस आयुक्तांच्या महामार्ग रस्ता बंदीच्या आदेशाचे पालन करीत होते. त्यावेळी जड वाहतुक टप्याटप्याने सोडत असताना आरोपीने त्याच्या ताब्यातील टँकर (जी.जे. 16 ए.यु. 7053) सर्व वाहनांना ओव्हरटेक करुन भरधाव वेगाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन रोडच्या मध्ये उभा केला. फिर्यादी पाटील यांना शिवीगाळ करुन, अंगावर धावून येवून धक्काबुक्की केली. तसेच शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक एम. एस. बेंबडे यांनी तपास करुन आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपत्र पाठविले. कोर्ट पैरवी म्हणून व्ही. ए. कोकणे यांनी काम पाहिले.
यात सरकारतर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांची साक्ष व सरकारी वकीलांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन आरोपी जामाखान यास सरकारी कामात अडथळा केल्याबद्दल न्यायालयाने 1 वर्ष कैदेची शिक्षा व अडीच हजार रुपये दंड ठोठावला. तसेच अन्य कलमान्वये त्यास शिक्षा सुनावली. यात सरकारतर्फे अॅड जी. आय. रामपूरे व अॅड. रजनी बुजरे यांनी काम पाहिले.