मुख्यमंत्र्यांचा कर्मचारी, अधिकाऱयांना सल्ला : ‘स्वयंपूर्ण मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात
प्रतिनिधी / पणजी
सरकारी जावई होऊ नका तर सरकारचे आणि जनतेचे मित्र बना असा संदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सरकारी कर्मचारी, अधिकारीवर्गास दिला असून त्यांनी सरकारी कर्मचाऱयांनी शनिवारचे 3 तास जनतेसाठी द्यावेत, असे आवाहन केले आहे. तसेच त्यांनी 8 तास नव्हे तर 24 तास काम करावे, असेही डॉ. सावंत म्हणाले.
‘आत्मनिर्भर भारत – स्वयंपूर्ण गोवा’ या मोहिमेंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या ‘स्वयंपूर्ण मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
योजना प्रत्येक घरात पोहोचण्याची गरज
आपल्या राज्यातील सर्व गावे, शहरे स्वयंपूर्ण करायची असतील तर सरकारी योजना घेऊन त्या गावात, शहरातील प्रत्येक घरात जाण्याची आणि त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्याची गरज आहे. गोवा मुक्त आणि स्वतंत्र झाला खरा परंतु तो अद्याप स्वावलंबी नाही. अजूनही इतर राज्यांवर गोव्याला अवलंबून राहावे लागते ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे, असे डॉ. सावंत यांनी नमूद केले.
केंद्राच्या 80 पैकी केवळ 32 योजनाच राज्यात सुरु
केंद्र सरकारच्या व गोवा सरकारच्या अनेक योजना आहेत. त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे त्याचा लाभ लोकांना मिळत नाही. कोरोना महामारीच्या काळात आणि तत्पूर्वी मिळून केंद्राने अर्थात मोदी सरकारने सुमारे 80 विविध योजना जनतेसाठी सुरु केल्या. त्यातील 30 ते 32 योजनाच सुरु करणे गोवा सरकारला शक्य झाले असून इतर योजना अद्याप गोवा सरकारला आलेल्या नाहीत. त्याला वेगळी कारण आहेत, असे डॉ. सावंत म्हणाले.
योजनांचा लाभ घेऊन स्वयंपूर्ण व्हा
केंद्र, गोवा सरकारच्या या सर्व योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचली आणि लोकांनी त्याचा लाभ घेतला तर गोवा स्वयंपूर्ण होण्यास वेळ लागणार नाही. त्यासाठीच सरकारी कर्मचारी, अधिकारी यांनी सरकारचे ‘स्वयंपूर्ण मित्र’ म्हणून घराघरांत जावे आणि गोवा स्वयंपूर्ण करण्यास साहाय्य करावे, असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले. ‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’ मोहिमेत सामील झालेल्या स्वयंपूर्ण मित्रांसाठी प्रशिक्षण सुरु करण्यात आले असून त्यात सरकारी कर्मचारी, अधिकारी सहभागी झाले आहेत.