परंतु उत्सव रद्द करण्याचा विचार नको, लोकमान्य गणेशोत्सव महामंडळाची भुमिका
बेळगाव / प्रतिनिधी
यावषीच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट आहे. हे संक्रमण गणेशोत्सवाच्या काळात वाढू नये याकरिता कर्नाटक राज्य सरकारने गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात करता येणार नाही असे जाहिर केले. यामुळे ऐतिहासीक वारसा लाभलेल्या बेळगावच्या गणेशोत्सव मंडळांमध्ये पेच निर्माण झाला आहे. आम्ही सरकारने दिलेल्या नियमावलीनुसारच गणेशोत्सव साजरा करू परंतु उत्सवाची परंपरा बंद करू नये अशी भुमिका लोकमान्य गणेशोत्सव महामंडळाने घेतली आहे.
बेळगाव व आसपासच्या जिल्हय़ांमध्ये गणेशोत्सव मोठय़ा उत्साहाने व जल्लोषात साजरा करण्यात येतो. परंतु यावषी कोरोनाचे संकट असल्यामुळे यावर अनेक निर्बंध येत आहेत. त्यातच राज्य सरकारने सार्वजनिक गणेशोत्सव रद्द करण्याचा विचार सुरू केला आहे. यामुळे बेळगावच्या ऐतिहासीक परंपरेमध्ये खंड पडणार काय असा प्रश्न मंडळांकडून उपस्थित करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यानेही गणेशोत्सवासाठी नियमावली तयार केली आहे. त्यानंतर कर्नाटक सरकारनेही याबाबतचा विचार सुरू केल्यामुळे मंडळे संभ्रमात आहेत.
सरकारने गणेशोत्सवासाठी नियमावली तयार करावी, त्यानुसारच बेळगावमधील गणेश मंडळे उत्सव साजरा करतील. यापूर्वी मंडळांनी स्वयंस्फूर्तीने साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रशासनाने गणेशोत्सव रद्द न करता नियमावली तयार करून त्या पद्धतीने आम्ही गणेशोत्सव साजरा करू असे लोकमान्य गणेशोत्सव महामंडळाने कळविले आहे. अध्यक्ष विजय जाधव, सचिव हेमंत हावळ, सुनिल जाधव, रवि कलघटगी, गजानन देवरमनी, नितिन जाधव यावेळी उपस्थित होते.