मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे युवकांना आवाहन,गोवा सरकारचा सीआयआयशी समन्वय करार
प्रतिनिधी / पणजी
केवळ सरकारी नोकरीच करायची आहे या मानसिकतेतून युवकांनी बाहेर यावे, सरकारी नोकरीसाठीच रोजगार विनिमय केंद्रात नोंदणी करायला हवी हा विचाराही बदलावा व खाजगी नोकरीसाठीही ऑनलाईन नोंदणी करावी. त्याशिवाय व्यवसाय मार्गदर्शनातील सॉफ्ट स्कील प्रशिक्षणासाठी मॉडल करीअर सेंटरशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.
गोवा सरकार आणि सीआयआय यांच्यात झालेल्या समन्वय कराराच्या हस्तांतरण कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्याच आल्तिनो येथील सरकारी निवासस्थानी आयोजित या कार्यक्रमास श्रम आणि रोजगार मंत्री जेनिफर मोन्सेरात, यांच्यासह सीआयआयचे कार्यकारी अध्यक्ष श्री. सौगतरॉय चौधरी, श्री. कोस्टाबीर, संजय कुमार, ललित सारस्वत, भालचंद्र केंक्रे, दिपंकर बरगली यांची उपस्थिती होती.
सीआयआयतर्फे गत 3 वर्षात देशभरातील सुमारे 4.5 लाख युवकांना समुपदेशन केले असून 1.45 लाख तरुणांना 5900 उद्योगात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. आता गोव्यात पुढील दोन वर्षात सुमारे 27 हजार तरुणांना मार्गदर्शन करण्यात येणार असून किमान 7000 उमेदवारांना रोजगार मिळवून देण्याचे प्रयत्न करण्यात येईल. उमेदवाराच्या क्षमतेनुसार या नोकऱया गोव्यासह अन्य राज्यात तसेच विदेशातही देण्यात येणार आहेत. त्याचाच भाग म्हणून सीआयआय टीमने काम आरंभले आहे. त्याद्वारे 240 उद्योगांशी संपर्क केला आहे. त्यातून सुमारे 100 उमेदवारांची सूची तयार करण्यात आली असून 74 जणांना नियुक्तीपत्रेही देण्यात आली आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आपल्या पुढील भाषणात, गोमंतकीय युवक प्रतिभावान असून त्यांच्यातील प्रतिभेला अधिक वाव मिळाल्यास बेकारीची समस्या मोठय़ा प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, असे सांगितले. विद्यमान रोजगार विनिमय केंद्र हे आता अत्याधुनिक असे मॉडेल करीअर सेंटर बनले आहे. तेथे खाजगी नोकरीसाठीही सीआयआयतर्फे समुपदेशनाची व्यवस्था करण्यात आली आहे. ही व्यवस्था संपूर्ण कार्यालयीन वेळेत उपलब्ध असणार आहे. त्याशिवाय राज्यात तालुका पातळीवर व्यवसाय प्रशिक्षण, मार्गदर्शन शिबिरांचेही आयोजन करण्यात येणार आहे. त्याद्वारे स्वतःची कार्यक्षमता वाढविण्यात उमेदवारांना मदत होणार आहे. सध्या नोकरी करणाऱयांनाही या शिबिरांचा लाभ घेता येणार आहे. एवढेच नव्हे तर मुलाखती कशा द्याव्या, यासंबंधीचे प्रशिक्षण देण्याचीही सरकारची तयारी आहे, याकामी सीआयआयचे योगदान महत्वपूर्ण ठरणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. मंत्री जेनिफर मोन्सेरात यांनीही मार्गदर्शन केले. खात्याचे आयुक्त राजू गावस यांनी स्वागत केले. जीसीसीआयचे उपाध्यक्ष अतूल जाधव यांनी आभार व्यक्त केले.