ऑनलाईन टीम / मुंबई :
उद्या सकाळी माझ्या घरी काही अधिकृत सरकारी पाहुणे भेट देणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मी खुल्या दिल्याने तयार आहे. त्यांच्यासाठी चहा आणि बिस्कीटही तयार असतील. त्यांना माझ्या घराचा अचूक पत्ता हवा असेल तर मला फोन करावा, असे सूचक ट्विट राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी रविवारी रात्री केलं आहे. मात्र, अद्याप मलिकांच्या घरी कोणत्याही तपास पथकांची धाड पडल्याचे वृत्त नाही.
या ट्विटनंतर मलिकांनी आज सकाळी पुन्हा एक ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, केंद्रीय यंत्रणांना माझ्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात माजी मुख्यमंत्र्यांना खूप रस आहे. मी सांगू इच्छितो की, त्यांनी स्वत:ची ओएसडी म्हणून आणि किरीट सोमय्या यांची प्रवक्ता म्हणून नियुक्ती करावी, अशी टीका मलिक यांनी फडणवीसांचे नाव न घेता केली.
दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची मालिका सुरू ठेवल्यामुळे एनसीबीची नाचक्की झाली होती. या प्रकरणानंतर आपल्यावर तपास यंत्रणांची धाड पडण्याची भीती मलिकांना आहे. त्यामुळे मलिकांनी आपल्या घरी अधिकृत पाहुणे येणार असल्याचे ट्विट केले होते.