पदवी, अभियांत्रिकी, पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना मिळणार योजनेचा लाभ : 1 लाख 55 हजार जणांना होणार वितरण
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यातील सरकारी पदवी, अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एकूण 1.55 लाख विद्यार्थ्यांना मोफत टॅब पीसी देण्यात येणार असल्याची घोषणा महाविद्यालयीन शिक्षण खात्याचे आयुक्त पी. प्रदीप यांनी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक दर्जाची सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले.
दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी विधानसौध येथे आयोजित ‘उत्तम प्रशासन दिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ‘उच्च शिक्षणात जागतिक पातळीवरील तयारी’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. कोरोनामुळे करण्यात आलेली ऑनलाईन शिक्षण व्यवस्था तात्पुरती आहे. लवकरच शाळा-महाविद्यालये सुरू होतील. त्यानंतर नियमित वर्ग सुरू होतील. मात्र, तांत्रिकदृष्टय़ा आपल्या विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर सक्षम बनविण्यासाठी सर्व प्रकारची आर्थिक मदत करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा उच्च शिक्षणमंत्री डॉ. सी. एन. अश्वथ नारायण सरसावले आहेत, असे ते म्हणाले.
यंदाच्या शैक्षणिक वर्षात 430 सरकारी पदवी महाविद्यालयांतील पहिल्या वर्षात शिकणारे विद्यार्थी, 14 सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थी आणि 87 सरकारी पॉलिटेक्निक महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱया प्रथम, द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना मोफत टॅब देण्यात येणार आहेत.
टॅब खरेदीसाठी एकूण 155 कोटी रुपये खर्च होणार असून एका टॅबची किंमत 10 हजार रुपये असेल. एखाद्या वेळेस अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना टॅब निरुपयोगी ठरत असेत तर नव्या आणि सुधारित श्रेणीतील लॅपटॉप खरेदीसाठी महाविद्यालयांमार्फतच शैक्षणिक कर्जाची व्यवस्था करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
चर्चासत्रप्रसंगी बेळगावच्या विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. करिसिद्धप्पा, लॅब इन ऍपचे पवन शिंदे उपस्थित होते.
टॅब खरेदीसाठी एकूण 155 कोटी रुपये खर्च होणार असून एका टॅबची किंमत 10 हजार रुपये असेल. एखाद्या वेळेस अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना टॅब निरुपयोगी ठरत असेल तर नव्या आणि सुधारित श्रेणीतील लॅपटॉप खरेदीसाठी महाविद्यालयांमार्फतच शैक्षणिक कर्जाची व्यवस्था करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. चर्चासत्रप्रसंगी बेळगावच्या विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. करिसिद्धप्पा, लॅब इन ऍपचे पवन शिंदे उपस्थित होते.
टेलिकॉम कंपन्यांशी चर्चा
ग्रामीण भागात डिजिटल किंवा ऑनलाईन शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांना अडथळे येऊ नयेत यासाठी इंटरनेट नेटवर्किंगची समस्या सोडविण्यासंबंधी टेलिकॉम कंपन्यांशी चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळे बहुतेक ठिकाणी समस्या सोडविण्यात आली आहे. उच्च शिक्षण संस्थांमध्ये स्मार्ट क्लास चालविण्यासाठी आणि समग्र अध्ययन प्रणाली परिणामकारक पद्धतीने जारी करण्यासाठी हाय-स्पीड इंटरनेट सेवा पुरविण्यात येत आहे, अशी माहिती देखील महाविद्यालयीन शिक्षण खात्याचे आयुक्त पी. प्रदीप यांनी दिली.