जिल्हा पोलीसप्रमुखांनी संशयितांना वेशीवरच रोखले
प्रतिनिधी बेळगाव
बेळगाव, बागलकोट जिल्हय़ातील सरकारी विश्रामधामावरील स्वयंपाकी व त्यांचे कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाली आह. या दोन्ही जिल्हय़ातील 30 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामध्ये बेळगाव जिल्हय़ातील 22 व बागलकोटमधील 8 जणांचा समावेश आहे. जिल्हा पोलीसप्रमुखांच्या सतर्कतेमुळे एक मोठा अनर्थ टळला आहे.
बेळगाव, बागलकोट जिल्हय़ातील वेगवेगळय़ा सरकारी विश्रामधामावर स्वयंपाकी म्हणून काम करणाऱया सात कुटुंबातील 38 जण रेल्वेने राजस्थानमधील अजमेर शरीफला गेले होते. 17 मार्च रोजी ते अजमेरला गेले. ख्वाजा गरीब नवाजच्या दर्शनानंतर तीन-चार दिवस ते तेथेच मुक्कामाला होते. नंतर पंतप्रधानांनी लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे हे 38 भाविक अजमेरमध्येच अडकले. तब्बल 40 दिवस हुक्केरी, निपाणी, चिकोडी, अथणी, बागलकोट, बदामी परिसरातील हे 38 जण अजमेरमध्येच अडकून पडले. तेथील प्रशासनाने दिलेला पास घेऊन जीजे 1, बीव्ही 9986 या खासगी आरामबसमधून हे सर्वजण बेळगावच्या दिशेने आले. त्यासाठी त्यांनी 1 लाख 40 हजार रुपयांहून अधिक रक्कम बसच्या भाडय़ापोटी मोजली होती.