व्हेंटिलेटर सरकारी असतानाही हॉस्पिटलकडून बिलात लाखोंची लूट
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोना काळात महापालिकेकडे 40 व्हेंटिलेटर आली होती. त्यापैकी 15 व्हेंटिलेटर सीपीआरसाठी 8 व्हेंटिलेटर आयसोलेशनसाठी आणि तीन व्हेंटिलेटर राजोपाध्ये नगरातील कोव्हीड सेंटरला देण्यात आली. उर्वरित व्हेंटिलेटर खासगी हॉस्पिटलना देण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून मिळाली आहे. ज्या खासगी हॉस्पिटलना कोणत्याही परवानगी, अटीशिवाय व्हेंटिलेटर देण्यात आली त्यांनी रुग्णांच्या बिलामध्ये व्हेंटिलेटरचे बील आकारुन लाखो रुपयांची लूट केली आहे. यामुळे महापालिकेने संबंधित हॉस्पिटलकडून ही बीले वसूल करुन रुग्णांना परत करावीत, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने महापालिकेसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.
रुपेश पाटील म्हणाले, महापालिकेकडे एकूण 40 व्हेंटिलेटर होते. त्यापैकी अनेक व्हेंटिलेटर वापरले नाहीत. सरकारी मालमत्ता खासगी व्यक्ती किंवा संस्थांना देण्याचा अधिकार महापालिका प्रशासनास आहे का ? असा प्रश्न आहे. या प्रश्नावर महापालिकेच्या उपायुक्तांनी आयुक्तांचा तोंडी आदेश असल्याचे कळवले. कोणतीही अट किंवा परवानगी शिवाय महापालिकेने खासगी हॉस्पिटलना व्हेंटिलेटर दिली. खासगी हॉस्पिटलमध्ये पण महापालिकेच्या व्हेंटिलेटरवर उपचार घेतलेल्या रुग्णांची यादी तपासली असता एका व्हेंटिलेटरवर दिवसाला 9 हजार रुपयांच्या बीलाची आकारणी केल्याची बाब समोर आली. सरकारी व्हेंटिलेटर असताना रुग्णालयाने उपचार घेणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक किंवा ऑडीटरना याबाबत माहिती दिली नाही. महापालिकेचे अधिकारी व आरोग्य विभागातील डॉक्टरांच्या आशिर्वादाने खासगी हॉस्पिटलना व्हेंटिलेटरचा प्रसाद वाटण्यात आला.
पीपीई कीटसाठी रोज सहा किटचे पैसे आकारले आहेत. अनेक रुग्णांसाठी दिवसभरात एकच कीट वापरुन प्रत्येक रुग्णांकडून रोज सहा किटचे बील घेवून एक प्रकारे लूट केली आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये पण सरकारी व्हेंटिलेटरवर उपचार घेतलेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना जादाची रक्कम खासगी हॉस्पीटलकडून वसूल करुन परत करावी. अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने महापालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा पाटील यांनी दिला. पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष अभिजित भोसले, सचिव अभिजित कांजर, निलेस सुतार, भगवान कोईगडे, संदीय यादव, विक्रमसिंह घोरपडे, अमरसिंह पाटील, उमेश जाधव, आसीफ स्वार उपस्थित होते.
सीपीआरने 15 व्हेंटिलेटर इन्स्टॉल केले नाहीत
सीपीआरसाठी दिलेल्या 15 व्हेंटिलेटरची चौकशी केली असता सीपीआरने ते इन्स्टॉलच केले नसल्याची माहिती मिळाली. कोरोना काळात रुग्णांची धावपळ होत असताना सीपीआरने व्हेंटिलेटर इन्स्टॉल न करता रुग्णांना जाणीवपूर्वक खासगी हॉस्पिटलचा रस्ता धरायला लावल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला.