हायटेक प्रयोगशाळेत करतात काम, शाळेची उपग्रह निर्मितीसाठी झाली निवड
बेंगळूरमधील मल्लेश्वरम सरकारी बॉइज हायस्कुल एक उदाहरण ठरले आहे. याचमुळे या शाळेची 75 उपग्रहांच्या निर्मितीसाठी निवड झाली आहे. हे उपग्रह पुढील वर्षी स्वातंत्र्यदिनी प्रक्षेपित होणार आहेत. हायटेक अटल टिंकरिंग लॅब हे या यशामागील कारण असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका लीला जीपी सांगतात. कर्नाटकात अशाप्रकारच्या प्रयोगशाळा केवळ 3 शाळांमध्ये आहेत.
राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत येथील विद्यार्थ्यांचे काही प्रकल्प पहिल्या 50 मध्ये निवडले गेले होते. याचमुळे शाळेला केंद्र सरकार आणि नीति आयोगाकडून अटल टिंकरिंग लॅब मिळाली होती. ही लॅब सर्व मुलांसाठी आहे, भले मग तो अन्य शाळेतील विद्यार्थी का असेना. या लॅबमध्ये सातत्याने प्रयोग केले जातात. या शाळेतील विद्यार्थ्यांना डेल ही आयटी कंपनी तांत्रिक मदत करत आहे. तसेच सॉफ्टवेअरही पुरवत आहे. इंडियन टेक्नॉलॉजिकल काँग्रेस असोसिएशन आणि इस्रो सातत्याने शाळेच्या संपर्कात आहे.
शाळेच्या या चांगल्या कामगिरीत अनेक स्वयंसेवी संस्थांचे महत्त्वाचे योगदान आहे. या संस्थांनी लॉकडाउनच्या काळात शाळेतील 1000 गरीब मुलांना उच्चक्षमतेचे टॅब पुरविले. लवकरच शाळेतील विद्यार्थ्यांना लॅपटॉप देण्यात येणार आहे. फौंडेशनचे सदस्य थेट विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. लॅबच्या प्रभारी मैत्रा या प्रकल्पामुळे वर्षभर कामात बुडालेल्या असतात. येथली मुले कोडिंगमध्ये खूपच तरबेज असल्याचे त्या सांगतात.
चांगले शिक्षण मिळविण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, याचमुळे या शाळेत मुलींनाही प्रवेश देण्यात येत आहे. उपग्रह प्रकल्पावर 8 वी ते 10 वीचे विद्यार्थी काम करणार आहेत. प्रकलपात मुलींनाही सामील केले जाईल.