नवी दिल्ली
सरकारने नॅशनल फर्टिलायजर्स लिमिटेड (एनएफएल) मधील 20 टक्के इतका वाटा विकण्याची योजना बनवली आहे. ही विक्री ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून केली जाणार असून याकरीता व्यवहार करण्यासाठी मर्चंट बँकर्स, ब्रोकर्स आणि कायदेशीर सल्लागारांनाही आवाहन करण्यात आले आहे. सदरच्या कंपनीत सरकारचा एकंदर वाटा हा 74 टक्के इतका आहे. ही कंपनी देशात युरियाचा सर्वात मोठा पुरवठा करणारी उत्पादक कंपनी म्हणून नावाजलेली आहे. सदरच्या वाटा विक्रीतून सरकारला 408 कोटी रुपये मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. चालू आर्थिक वर्षात सरकारला सदरची रक्कम प्राप्त करायची आहे, त्यासाठीच हिस्सेदारी विकण्याचा मार्ग सरकारकडून अनुसरला जात आहे.