भाजप-काँग्रेसमध्ये सत्तेसाठी चिवट संघर्ष : अनेक दिग्गजांच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष,सुदिन ढवळीकर सध्या ठरलेय खास आकर्षण,भाजपची भिस्त आता केवळ अपक्ष उमेदवारांवर
प्रतिनिधी /पणजी
राज्यात सरकार कोणाचे? याचा फैसला गोमंतकीय जनतेने दि. 14 फेब्रुवारी रोजी नेमका कोणला दिला होता ते आज सकाळी उघड केले जाणार आहे. उत्तर गोव्यातील 19 मतदारसंघांची मतमोजणी पणजीत आल्तिनो येथील शासकीय तंत्रनिकेतन सभागृहात तर दक्षिण गोव्यातील 21 मतदारसंघांची मतमोजणी मडगावच्या दामोदर कॉलेज सभागृहात सकाळी 8 वाजल्यापासून होणार आहे. एकाचवेळी 40 ही मतदारसंघांची मतमोजणी हाती घेण्यात येणार असल्याने संपूर्ण गोव्याचे राजकीय चित्र हे सकाळी 11 ते 11.30 वा. पर्यंत स्पष्ट होईल. सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस पक्ष यांच्यादरम्यान सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या असून कर्नाटकाचे काँग्रेस नेते डि. शिवकुमार हे गोव्यात आल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांचा निवाडा आज जाहीर होणार असल्याने सर्वांचे लक्ष एका ऐतिहासिक घटनेकडे लागून राहिले आहे.
अनेक दिग्गजांच्या निकालांकडे लक्ष
राज्यात आगामी सरकार कोणाचे? यावर जनतेने दि. 14 फेब्रुवारी रोजी निवाडा दिलेला होता. मात्र हा निवाडा नेमका कोणता होता? हे आज सकाळी मतमोजणीतून उघड होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मांद्रेमध्ये माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, पणजीत उत्पल पर्रीकर याशिवाय मडगावात दिगंबर कामत विरुद्ध उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, केपेमध्ये उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, मुरगावात भाजपचे मिलिंद नाईक, डिचोलीत सभापती राजेश पाटणेकर या अशा अनेक दिग्गज नेत्यांच्या निकालाकडे साऱया जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. गोव्याचा निवाडा नेमका कसा असेल याबाबत केवळ गोव्यातच नव्हे तर देशातील सर्वच राजकीय पक्षांना कमालिची उत्सुकता लागलेली आहे.
सुदिन ढवळीकर सध्या खास आकर्षण
किंगमेकर नव्हे ‘किंग’ भूमिका बजावणार म्हणून सांगणाऱया मगो नेते सुदिन ढवळीकर हे सध्या खास आकर्षण ठरले असून त्यांच्या पक्षाला केवढे यश प्राप्त होतेय यावर सरकार घडविण्याचे भवितव्य ठरणार आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी अनेकजण इच्छूक
भाजपतर्फे डॉ. प्रमोद सावंत हे मुख्यमंत्रीपदाचे पुन्हा एकदा उमेदवार आहेत तर आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे देखील या पदासाठी दंड थोपटून उभे आहेत. काँग्रेस तर्फे दिगंबर कामत हे या पदासाठी इच्छुक आहेत. कोणत्याही एका राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही व गोवा विधानसभा त्रिशंकू राहील असे निष्कर्ष आतापर्यंत सर्वच प्रसारमाध्यमांनी काढलेले असल्याने आज नेमकी कोणाची सरशी होणार? याकडे सर्वांचे लाक्ष लागलेले आहे.
पहिल्यांदाच एकाच वेळी सर्व मतदारसंघ मतमोजणीस प्रारंभ
मतमोजणी सकाळी 8 वा. पासून सुरु होईल. अगोदर टपाल मतांची मोजणी झाल्यानंतर सकाळी 8.30 वा. पासून प्रत्यक्षात मतपेटय़ा उघडल्या जातील. त्यानंतर 8 ते 10 फेऱयांमध्ये मतमोजणी पूर्ण होईल. गोव्यात अशा तऱहेने एकाचवेळी 40 ही मतदारसंघाची मतमोजणी हाती घेण्याचा हा पहिलाच उपक्रम आहे.
प्रचंड उत्सुकता ! भाजप-काँग्रेसमध्ये चढाओढ सुरु
निकाल होण्याअगोदर 48 तासांपासून गोव्यात हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झालेला आहे. निवडणुकीचे निकाल नेमके कोणते लागतील, याबाबत कमालीची उत्सुकता लागलेली आहे. या पार्श्वभूमीवर व भाजपकडून होणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन काँग्रेसने आपल्या सर्वच उमेदवारांना पणजीतून मडगावच्या परिसरातील एका हॉटेलवर नेऊन सुरक्षित ठेवले आहे. कोणत्याही परिस्थितीत सरकार स्थापन करणारच असा आग्रह भाजपने धरला आहे तर काँग्रेसने यावेळी भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी सर्व दिशांनी फिल्डिंग लावलेली आहे. काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते गोव्यात आलेले आहेत. ते आज सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. या गडबडीत मगो पक्षाने भाजपपासून पूर्णतः फारकत घेण्याचा निर्णय जाहीर करून काँग्रेस बरोबर जाण्याचे ठरविले आहे.
भाजपची भिस्त आता केवळ अपक्षांवर
काँग्रेसने भाजपची गोची करून टाकलेली असल्याने भाजपची सारी भिस्त आता अपक्षांवर आहे. भाजपने अनेक अपक्षांशी संपर्क साधला आहे आणि सरकार घडविण्यात सहकार्य मागितले आहे तर काही अपक्षांना भाजपने आपल्या ताब्यात घेतले असल्याचे वृत्त आहे.
काँग्रेस कँप मजबुत दरम्यान काँग्रेसच्या कँपमध्ये मगो, तृणमूल काँग्रेस, अपक्ष, गोवा फॉवरर्ड आणि आप हे देखील असल्याने काँग्रेसची बाजू मजबूत झालेली आहे. तर भाजप सध्या तरी एकाकी आहे.