दीपक पाऊसकरांचा भाजपावर थेट हल्ला
प्रतिनिधी /धारबांदोडा
गोव्यातील सरकार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत नव्हे, बाबुश मोन्सरात चालवित असल्याचा आरोप माजीमंत्री दीपक पाऊसकर यांनी केला आहे. अल्पमतात आलेले भाजपचे सरकार बाबू आजगावकर व आपल्या पाठिंब्यावर टिकले. मात्र त्यांनी आमच्या या त्यागाची कदर उमेदवारी नाकारुन केली. सरकारमध्ये मंत्री असूनही आपली सर्व कामे अडवून ठेवण्यात आली. सावर्डे मतदारसंघाच्या विकासावर परिणाम होऊ नये म्हणून आपण हा अन्याय सहन केला असा थेट आरोप पाऊसकर यांनी केला आहे.
भाजपाने सावर्डे मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्यानंतर पाऊसकर यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी सोनावळी कुळे येथील श्री दूधसागर देवाला श्रीफळ ठेवून त्यांनी मोठय़ा दणक्यात प्रचाराला सुरुवात केली. यावेळी सावर्डेचे सरपंच संदीप पाऊसकर, कुळेच्या उपसरपंच खुशी वेळीप, धारबांदोडाच्या पंचसदस्य निलम केरकर, मोलेचे पंचसदस्य सुभाष भगत, दाभाळचे पंच बाली गावकर, सावर्डे प्रोग्रेसिव्ह प्रंटचे अध्यक्ष संतोष गावकर व कार्यकर्ते मोठय़ासंख्येने उपस्थित होते.
मिलिंदना उमेदवारी, मग मला का नाही?
मिलिंद नाईक यांना उमेदवारी दिली जाते, मात्र आपल्याला का नाकारली गेली असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. दूधसागर ऑपरेटर्सच्या समस्या व जीपगाडय़ांच्या खेपा वाढवून देण्याची विनंती या सरकारने झिडकारली. संजीवनी साखर कारखान्याच्या कामगारांचा प्रश्नही आपण सातत्याने मांडला. मात्र सरकारला कारखाना चालविण्यास स्वारस्य नसल्याचे दिसून आले, असेही ते म्हणाले.
कर्नाटकात खाणी सरु, गोव्यात का नाही?
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खनिज महामंडळ स्थापन करुन खाण व्यवसाय सुरु करणे शक्य होते. मात्र खाण उद्योजकांचे हित जपण्यासाठी परवान्याचे नूतनीकरण करण्यात आले. कर्नाटक राज्यात खाण व्यवसाय सुरळीत सुरु आहे, मग गोव्यात का होऊ शकत नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पाच वर्षाच्या कार्यकाळत आपण सावर्डे मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला. येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढला. कुळे पंचायत क्षोत्रात रु. 100 कोटींची विकासकामे राबविली अशी माहिती त्यांनी दिली. सावर्डेतील मतदारांच्या पाठिंब्यावर आपण मोठय़ा मताधिक्याने विजयी होऊ असा दावाही त्यांनी केला. संतोष गावकर यांनी सावर्डे प्रोग्रेसिव्ह प्रंटचा दीपक पाऊसकर यांना पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले. सन 2017 च्या निवडणुकीत दीपक पाऊसकर यांना उमेदवारी द्यावी अशी जोरदार मागणी प्रंटतर्फे मनोहर पर्रीकर यांच्याकडे केली होती. ती फेटाळली गेल्याने, आम्ही भाजपाविरुद्ध काम करण्याचा निर्णय घेतला होता. पुन्हा पक्षाने तीच चूक केली आहे, असे ते म्हणाले.