प्रतिनिधी/ बेळगाव
सरदार्स मैदानावर उभारण्यात आलेल्या व्यापारी संकुलातील गाळय़ांचे काम अर्धवट अवस्थेत असून याठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे भाडेतत्वावर देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या लिलाव प्रक्रियेला ब्रेक लागला आहे. मात्र नागरी सुविधा उपलब्ध नसल्याचे कारण असले तरी लिलाव प्रक्रियेला ब्रेक लागण्यामागे राजकारण असल्याची चर्चा सुरू आहे.
सरदार्स मैदानावर महापालिकेच्या शंभर कोटी अनुदानामधून क्रीडा संकुल, व्यापारी गाळे आणि गॅलरी उभारण्यात आली आहे. येथील चार व्यापारी गाळे भाडेतत्वावर देण्यासाठी महापालिका प्रशासनाने लिलाव प्रक्रिया आयोजित केली होती. सदर गाळय़ांची माहिती भाडेकरूंना मिळावी याकरिता गाळय़ांच्या आवारात लिलाव प्रक्रियेला शुक्रवारी सकाळी प्रारंभ करण्यात आला. यावेळी सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत 29 नागरिकांनी लिलावाकरिता नोंदणी करून प्रत्येकी 50 हजार रुपये भरले होते. त्यामुळे दुपारी एक वाजता लिलाव प्रक्रियेला प्रारंभ करण्यात येणार होता. पण सदर व्यापारी संकुलाला गळती लागल्याने गाळय़ांमध्ये पाणी साचत असल्याचे निदर्शनास आले. चार गाळे असून पार्टिशनच्या भिंती केवळ दहा फुटाच्या आहेत. गाळय़ांच्या भिंतीचे बांधकामही अर्धवट असल्याने याबाबत नागरिकांनी आक्षेप घेतला. तसेच व्यावसायिक आणि ग्राहकांसाठी स्वच्छतागृह, पाण्याची व्यवस्था, विद्युतपुरवठा आदी अनेक सुविधा उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे लिलाव प्रक्रियेत भाग घेतलेल्या नागरिकांनी अर्धवट कामाबाबत तक्रारी केल्या. सदर लिलाव प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करण्यात आली. असुविधांमुळे लिलाव प्रक्रिया रद्द करण्याकरिता महापालिका आयुक्त आणि महसूल उपायुक्तांशी चर्चा करण्यात आली. तसेच महापालिकेच्या महसूल विभागाच्यावतीने लिलाव प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच लिलावात भाग घेण्यासाठी पन्नास हजार रुपये दिलेल्या नागरिकांना त्यांची रक्कम परत करण्यात आली. तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध केल्यानंतर लिलाव प्रक्रिया आयोजित करून कळविण्यात येईल असे सांगण्यात आले. लिलाव प्रक्रिया रद्द झाल्याने नागरिकांची निराशा झाली.
चार गाळय़ांच्या लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी 26 नागरिकांनी भाग घेतला होंता. त्यामुळे गाळे घेण्यासाठी चढाओढ वाढून बोलीची रक्कम वाढण्याची शक्मयता होती. पण लिलाव प्रक्रियाच रद्द झाली. लिलाव प्रक्रियेवेळी महसूल अधिकारी संतोष अनिशेट्टर, मार्केट महसूल निरीक्षक नंदु बांदिवडेकर, लेखाअधिकारी आनंद होंगल तसेच महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
लिलाव रद्द करण्याचा निर्णय गुप्त बैठकीत
सरदार्स मैदानावरील गाळय़ांचे काम अर्धवट असल्याचे कारण पुढे करून लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात आली. पण लिलाव प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय गुरुवारी महापालिका आयुक्तांच्या कक्षात झालेल्या गुप्त बैठकीत झाला असल्याची चर्चा आहे. हिंदू संघटनेसह राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लिलाव प्रक्रियेत भाग घेतला होता. गाळे मर्जीतील नागरिकांना मिळावेत याकरिता राजकीय व्यक्तींनी प्रयत्न चालविले होते. मात्र सदर लिलाव प्रक्रिया खुल्या पद्धतीने व पारदर्शी असल्याने मर्जीतील नागरिकांना गाळे मिळणे अशक्मय आहे. त्यामुळेच लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
महापालिकेकडून दीड कोटीचा निधी खर्च
सरदार्स मैदान शैक्षणिक खात्याच्या अखत्यारित येते. त्यामुळे सदर जागा शैक्षणिक खात्याच्या मालकीची असताना महापालिका गाळे भाडेतत्वावर कसे देणार? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. पण सदर गाळे मुख्यमंत्री विकास अनुदानामधून बांधण्यात आले असून याकरिता शैक्षणिक खात्याने जागा महापालिकेकडे हस्तांतर केली होती. त्यामुळे महापालिकेने दीड कोटीचा निधी खर्च करून व्यापारी गाळय़ांचे बांधकाम पूर्ण केले आहे. त्यामुळे महापालिकेच्यावतीने गाळे भाडेतत्वावर देण्यात येत असल्याची माहिती महापालिकेचे महसूल अधिकारी संतोष अनिशेट्टर यांनी दिली.