राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या उपस्थितीत पदग्रहण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती नथालापती व्यंकट उर्फ एन. व्ही. रमण यांनी शनिवारी शपथ ग्रहण करत पदभार स्विकारला. राष्ट्रपती भवन येथे सकाळी 11 वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना सरन्यायाधीश पदाची शपथ दिली. याप्रसंगी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सर्वोच्च न्यायालयातील अनेक न्यायमूर्ती उपस्थित होते. माजी सरन्यायाधीश शरद बोबडे हे शुक्रवार, 23 एप्रिलला निवृत्त झाले आहेत.
नवनियुक्त सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांचा कार्यकाल पुढचे 16 महिने असणार आहे. गेल्या काही वर्षात रमण यांनी अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांचा निकाल दिला. त्यामध्ये जम्मू-काश्मीरला इंटरनेट सुविधा पुन्हा देण्याच्या निर्णयाचा समावेश होता. सरन्यायाधीशांचे कार्यालय माहिती अधिकाराच्या कायद्याखाली आणण्याचा निर्णय देणाऱया खंडपीठामध्येही त्यांचा समावेश होता.
एन. व्ही. रमण यांचा जन्म आंध्रप्रदेशमधील कृष्णा या जिह्यात पोन्नावरम या गावात झाला. मृदुभाषी स्वभाव असलेल्या रमण यांनी 1983 साली आपल्या वकिलीची सुरुवात केली. त्यांनी केंद्र सरकारसाठी अतिरिक्त स्थायी वकील तसेच केंद्रीय प्रशासनिक अधिकरणामध्ये स्थायी वकील म्हणून काम केले आहे. 2000 साली ते आंध्रप्रदेशच्या स्थायी न्यायालयाचे न्यायाधीश बनले. 2013 साली त्यांची नियुक्ती दिल्ली उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून झाली. 2014 साली रमण यांनी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून काम सुरू केले होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भाग घेतला.