नवी दिल्ली / ऑनलाईन टीम
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाल पुढील महिन्यात अखेरीस म्हणजे २३ एप्रिल रोजी संपत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने नवीन सरन्यायाधीश निवडीची प्रक्रिया सुरू केली होती. केंद्र सरकारकडून सरन्यायाधीश पदासाठी नवीन नाव सूचवण्याची सूचना केली होती. त्यानंतर सरन्यायाधाशी बोबडे यांनी उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती एन.व्ही. रमण यांच्या नावाची केंद्राकडे शिफारस केली आहे.
न्यायमूर्ती एन. व्ही. रमण हे सरन्यायधीश शरद बोबडे यांच्यानंतर सुप्रीम कोर्टातील सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. नुथुलापटी वेंकट रमण यांचा जन्म 27 ऑगस्ट 1957 रोजी झाला होता. रमण हे आंध्र प्रदेशातील शेतकरी कुटुंबातील आहेत. न्यायमूर्ती रमण यांना एक वर्ष चार महिने इतका कार्यकाळ मिळणार आहे. 26 ऑगस्ट 2022 ला ते सेवानिवृत्त होतील. जून 2000 मध्ये त्यांची आंध्र प्रदेशच्या हायकोर्टात कायमस्वरुपी न्यायमूर्ती म्हणून निवड झाली होती. त्यानंतर त्यांनी दिल्ली हायकोर्टात मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम केले. सुप्रीम कोर्टात 2014 पासून ते कार्यरत आहेत.