प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
निवडणुका झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हय़ातील 70 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या निवडणुका 11 फेब्रुवारीला घेण्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. सरपंचपदाच्या सर्व निवडणुका एकाच दिवशी होणार आहेत. त्यामुळे आता सरपंचपदी कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता आहे.
सिंधुदुर्ग जिल्हय़ात 431 ग्रामपंचायती आहेत. पैकी पाच वर्षांची मुदत संपलेल्या 70 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका 15 जानेवारीला झाल्यानंतर 28 जानेवारीला सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली होती. निवडणूक झाल्यापासून एक महिन्याच्या आत सरपंच निवडणूक होणे आवश्यक असते. त्या प्रमाणे 15 फेब्रुवारीपूर्वी सरपंच निवडणूक घेणे आवश्यक असल्याने 11 फेब्रुवारीला निवडणूक घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सर्व सत्तर सरपंचपदांची निवडणूक एकाच दिवशी घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
यापूर्वी थेट सरपंच निवडणूक होत होती. मात्र आता निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंच निवड होणार आहे. त्यामुळे सरपंचपदी वर्णी लागण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.