प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
ग्रामपंचायत निवडणुका झाल्यानंतर आता या ग्रामपंचायतींमध्ये कोण सरपंच विराजमान होणार, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली होती. त्याचप्रमाणे या सरपंच निवडणुकीसाठी कोणत्या ग्रामपंचायतीत कोणत्या प्रवर्गाचे आरक्षण पडणार, याचीही उत्सुकता लागून राहिली आहे. मात्र ही उत्सुकता गुरुवारी संपणार आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता सरपंच आरक्षण सोडत सर्व तालुकास्तरावर होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हय़ात एकूण 431 एवढय़ा ग्रामपंचायती असून या ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षण सोडतीसाठी डिसेंबर 2020 मध्ये आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली होती. मात्र आरक्षण सोडत होण्यापूर्वी जिल्हय़ातील मुदती संपलेल्या 70 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्याने ही आरक्षण सोडत थांबविण्यात आली होती. मात्र आता ही सरपंच आरक्षण सोडत गुरुवारी होणार आहे. सरपंच आरक्षण सोडत रद्द झाल्याने जिल्हय़ातील निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये कोणत्या प्रवर्गाचा सरपंच विराजमान होणार, हे स्पष्ट झाले नव्हते. त्यामुळे आता निवडणूक संपल्यानंतर या ग्रामपंचायतींवर कोण सरपंच म्हणून विराजमान होणार, याची उत्सुकता आता संपणार आहे. जिल्हय़ातील 431 सही ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदासाठी आरक्षण सोडत होणार आहे.