प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ातील 2020-25 या कालावधीसाठी जिल्हय़ातील एकूण 431 ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाची आरक्षण सोडत 28 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालय ठिकाणी एकाच दिवशी काढण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान आरक्षण सोडतीनंतर राजकीय भवितव्याचा कुणाचा पत्ता कट होईल, तर कुणाला संधी मिळेल, हे स्पष्ट होणार आहे.
जिल्हय़ातील सर्व 431 ग्रा. पं. च्या पुढील 2020 ते 25 या कालावधीसाठी सरपंच पदाची आरक्षण सोडत 28 रोजी एकाच दिवशी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तालुक्याचे तहसीलदार आरक्षण सोडत चिट्टय़ा काढणार आहेत. जिल्हय़ातील 431 ग्रा. पं. मध्ये सावंतवाडी तालुक्यातील 63, दोडामार्ग तालुक्यातील 36, कुडाळ 68, वेंगुर्ले 30, मालवण 65, कणकवली 63, देवगड 72, तर वैभववाडी तालुक्यातील 34 ग्रा. पं. च्या सरपंच पदाचे आरक्षण काढले जाणार आहे.
ग्रामपंचायतींच्या प्रवर्गनिहाय सरपंचांची पदे ग्रामविकास व जलसंधारण विभाग यांनी सार्वत्रिक निवडणुका विचारात घेऊन निश्चित केली असून अनुसुचित जाती प्रवर्ग आणि महिलांसाठी अनुसुचित जमाती, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी, नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी, खुल्या प्रवर्गासाठी व खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी या प्रमाणे पदे आरक्षित असणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.